📖 सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे मराठी विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळा १५ सप्टेंबर रोजी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; प्राध्यापकांना नवी संधी

Date: 2025-09-11
news-banner

📖 सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात मराठी विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळा

१५ सप्टेंबर रोजी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; प्राध्यापकांना नवी संधी

पालघर, दि. ११ (प्रतिनिधी) –
मराठी ज्ञानकोश समृद्ध करण्यासाठी पालघरकरांना एक आगळीवेगळी संधी मिळणार आहे. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या वतीने महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सोमवार, १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयाच्या परिसरात होणार आहे.

✍️ लेखनकौशल्य विकसित करण्याचा उद्देश

मराठी विश्वकोशासाठी नव्या नोंदी तयार करण्यासाठी लागणारे शास्त्रशुद्ध लेखनकौशल्य आत्मसात करणे हा या कार्यशाळेचा प्रमुख हेतू आहे. नोंदलेखनात संदर्भग्रंथांचा वापर, विषयानुरूप सुस्पष्ट मांडणी आणि विश्वकोशीय लेखनाची पद्धत याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

🎓 मान्यवरांची उपस्थिती

या कार्यशाळेस महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, सहायक सचिव श्री. ललित कुडमथे आणि दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मार्गदर्शनासाठी मुंबई विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. मीनल कातरणीकर आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहाय्यक आनंद गेडाम सहभागी होणार आहेत.

🌟 प्राध्यापकांसाठी सुवर्णसंधी

मराठी विश्वकोश हे ज्ञानवृद्धीचे महत्त्वाचे साधन असून सामाजिक शास्त्र क्षेत्रात लेखन करू इच्छिणाऱ्या प्राध्यापकांना यात सहभागाची संधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुक प्राध्यापकांनी कार्यशाळेत आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले आहे.

संपर्कासाठी :
📞 डॉ. रोहित गायकवाड – ९४२३७१९१३७
📞 प्रा. संतोष सिरसाट – ७०२०८५०९२४




Leave Your Comments