जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कोणत्याही क्षणी घोषित होऊ शकते, असे असताना, आताच बोईसर नगरपरिषद स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली आहे, याचे परिणाम काय होऊ शकतात, याची चर्चा करणारे नवयुग पालघर ३१
०८/०७.०९ अंकातील हे संपादकीय :
बोईसर नगरपरिषद निर्मिती प्रक्रिया
जि.प. पं.समिती निवडणूक लांबवणार ?
बोईसर नगरपरिषद स्थापन करण्यासंबंधीच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्याचे जिल्हाधिकार्यांकडून संबंधित विभागाला पाठवण्यात आलेल्या पत्रावरून तसेच सोमवार ०८ सप्टेंबर रोजी या संबंधात आयोजित बैठकीवरून स्पष्ट होत आहे.विशेष म्हणजे बोईसर नगरपरिषदेच्या स्थापनेची चर्चा प्रत्येक जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीदरम्यानच आजवर होत आलेली आहे, यावेळी पुन्हा तेच घडत आहे. त्यातच जिल्हा परिषद - पंचायत समिती प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली असून कोणत्याही क्षणी जिल्हा परिषद - पंचायत समिती निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता असताना हे घडत आहे.
२०१९ च्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पालघरमध्ये आले असताना, त्यांनी बोईसर नगरपरिषदेसंबंधात सुतोवाच केले होते.मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीचा पराभव झाला तदनंतर हा विषय बंद झाला. पुढे जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक दरम्यानही बोईसर नगरपरिषद स्थापने संबंधित प्रस्तावाची चर्चा सुरू झाली.मात्र प्रत्येक वेळी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांची संख्या घटून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील सत्तेवर त्याचा परिणाम होईल हा मुद्दा प्रबळ होऊन बोईसर नगरपरिषद स्थापनेचा प्रस्ताव शीतपेटीत ठेवण्यात आला. आता जिल्हाधिकार्यांनी पुन्हा ही प्रक्रिया सुरू केली आहे.
अलीकडे आमच्या माहितीप्रमाणे पालकमंत्र्यांच्या दौर्यादरम्यान बोईसर नगरपरिषदेच्या प्रस्तावाची विचारणा करण्यात आली असता जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा प्रस्ताव आलेला नसल्याचे सांगण्यात आले. यावर जिल्हा परिषदेने स्थायी समितीने असा ठराव केलेला असून तसा प्रस्ताव आपल्याकडे पाठवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला दिली. तदनंतर या संदर्भात पुन्हा हालचाली सुरू झाल्या. जिल्हा परिषदेने स्थायी समितीच्या ठरावासह आवश्यक माहिती जिल्हा प्रशासनाला पुरविली आहे. या अनुषंगाने जाता जिल्हा प्रशासनाने नगरपरिषद स्थापनेसाठीची आवश्यक माहिती जिल्हा परिषद /पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींकडून मागवल्याचे समोर आले आहे.
बोईसर नगर परिषद स्थापनेची प्रक्रिया आता सुरू केल्यास जिल्हा परिषद -पंचायत समिती निवडणूकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद पंचायत समिती प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करून यासंदर्भात सुनावणी झालेली आहे. अशा परिस्थितीत बोईसर नगरपरिषद स्थापनेचा निर्णय झाल्यास जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पुढे ढकलली जाऊ शकते
बोईसर नगरपरिषद बोईसर, सरावली, पास्थळ, सालवड, खैरेपाडा, बेटेगाव, कोलवडे, कुंभवली आदी ०८ ग्रामपंचायत मिळून बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बोईसर नगरपरिषदेचा निर्णय झाल्यास, पालघर तालुक्यातीलसध्याच्या ३७ तारापूर,३८ दांडी,३९ पास्थळ,४०बोईसर,४१ बोईसर, ४२ सरावली,४३ खैरेपडा, ४९ सातपाटी या ०८ जिल्हा परिषद गटांवर तसेच ७४ कुरगाव, ७६ नवापूर,७७ सालवड,७८ पास्थळ, ७९ काटकरपाडा,८० बोईसर,८१ बोईसर,८२ दांडीपाडा,८३ सरावली, ८४ सरावली, ८५ उमरोळी,८६ खैरापाडा,९७ मुरबे आदी १४ पंचायत समिती गणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.याचा अर्थ पुन्हा प्रभाग रचना करणे क्रमप्राप्त महणजेच निवडणूकीवर गडांतर.निवडणूक आयोग याला मान्यता देणार का ?
या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर तसेच प्रशासकीय स्तरावर काय निर्णय होणार तसेच निवडणूक आयोग या संदर्भात कोणते भूमिका घेणार हा प्रश्न उपस्थित होत आहे