२४ ऑगस्टचे हे संपादकीय : **खड्डयात किती काळ राहायचे ?**

Date: 2025-08-29
news-banner
मुंबई - अहमदाबाद महामार्ग गेली अनेक वर्ष समस्यांचा विषय बनलेला असताना, पालघर नगरपरिषद खड्ड्यांचे शहर बनले आहे, नागरिक आपला संताप दररोज व्यक्त करत असताना, प्रशासन, सत्ताधारी प्रतिनिधी हतबल ठरलेले दिसतात. जिल्हाभर हेच चित्र आहे.
शासनाकडे निधीची चणचण आहे, मात्र निधी अनावश्यक ठिकाणी खर्च होत आहे,
 या पार्श्वभूमीवर नवयुग पालघरचे 
२४ ऑगस्टचे हे संपादकीय : 

            **खड्डयात किती काळ राहायचे ?**

          मुंबईचा प्रवेश कधी सुधारणार असा सवाल करणारी पालघरच्या माजी नगराध्यक्ष उज्वला काळे यांची चित्रफित समाज माध्यमावर गेले काही दिवस पसरत आहे. विशेषत: एक प्रकारे आपल्याच उपमुख्यमंत्र्यांना, एकनाथ शिंदे यांना हा सवाल त्या करताहेत, हे बरे झाले. अर्थात वाहतूक कोंडी,  रस्त्यावरील जागोजागीचे  खड्डे ही दररोज ये-जा करणार्‍यांची नेहमीचीच समस्या राहिलेली आहे. त्या पालघरहून घोडबंदरपर्यंत सव्वा तासात पोहोचल्या.म्हणजे  एक नवलच.त्या दिवशीचा त्यांचा हा अनुभव आहे. पण एरव्ही हाच मार्ग पाच-पाच तास रखडपट्टी करत असतो हे त्यांना ठाऊक  असणारच. गेली दोन वर्ष हे सुरू आहे आणि ६०० कोटी खर्च करून हे आपल्या पदरात पडलेलं आहे. 
  तसं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अनेकदा पालघरला आले.ते  हवेतून उडत येत असल्यामुळे त्यांना याची फारशी झळ पोचली नाही. मात्र काही वेळा या रस्त्यावरूनचा हवेतील प्रवास त्यांनीही अनुभवला असणार.आमचे पालकमंत्री तर अलीकडे पालघरला नेहमी येत असल्याने हा अनुभव वारंवार घेत आहेत. मागील एका सभेत पालकमंत्र्यांनी याबाबतीत जिल्हाधिकार्‍यांवर जबाबदारी  सोपवून, अहवाल सादर करण्यास सांगितले आणि येत्या जनता दरबारात त्याचा सोक्षमोक्ष लावण्याची घोषणा केली. अलीकडे त्यांचा जनता दरबार जव्हार येथे झाला, त्यावेळी हा मुद्दा समोर आला की नाही हे समजले नाही.   
           मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या समस्यांचे रडगाणे कितींदा गायचे हाही प्रश्नच आहे. याकरिता मुख्यमंत्र्यांपासून खासदार, आमदार सार्‍यांनीच आढावा बैठका घेऊन वर्तमानपत्रांना त्याची प्रसिद्धीही केली आहे. मात्र परिस्थिती जैसे थे च आहे. 
 डॉ. उज्वला काळे तिथल्या  रस्त्याबद्दल बोलत असताना ज्या नगरपरिषदेच्या त्या नगराध्यक्ष राहिल्या, तेथील रस्त्यांच्या अवस्थेबद्दल का बोलत नाही असा सवाल समाजमाध्यमांवर त्यांना विचारला जात आहे. यावर उत्तर देताना, आता प्रशासक असल्याचे कारण त्या सांगत आहेत. उज्वला काळे जर मुंबई प्रवेशद्वारावरील   रस्त्याबद्दल आपले गार्‍हाणे मांडत असतील तर इथल्या  प्रशासकाला का जाब विचारत नाहीत, हा प्रश्न आहे आणि त्या आज कोणत्याही पदावर नसल्या तरी राज्य सरकार त्यांच्याच पक्षाचे आहे. आपल्या कार्यक्षम उपमुख्यमंत्र्यांकडे त्या याबाबतची तक्रारी करू शकतात. पालघर नगरपरिषदहद्दीतील  प्रमुख रस्ते  हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. काही प्रमुख ठिकाणे आहेत जिथे वारंवार रस्ता  दुरुस्त करूनही पुन्हा तीच परिस्थिती उदभवते. मात्र याकडे कोणी गांभीर्याने लक्ष देत असल्याचे दिसत नाही.टेंभोडे महाविद्यालय रस्त्यावर अलीकडेच खड्डे बुजवले गेले. पंधरा दिवसांनंतर पुन्हा रस्ता (नव्हे खड्डे) पूर्वपदावर आला आहे. अलीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे भागातील रस्ता दुरुस्तीवर पाहणी करत असताना  खड्डे बुजवण्याच्या तंत्रासंबंधात काही सूचना केल्याचे दिसून येते. आपल्या येथे खड्डे बुजवताना या सूचना पाळल्या तर निश्चितपणे काही वेगळा अनुभव येऊ शकेल.
  पालघर शहरातील मुख्य रस्त्यांसह, लोकमान्य नगर नवली, वेवूर, टेंभोडे अशा सर्वच भागात रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळते. अर्थात जिल्ह्यातही अनेक ठिकाणी विशेषत: मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागात देखील असेच चित्र आहे. सरकार नको त्या ठिकाणी निधीची उधळण करत असल्याने अशा महत्त्वाच्या कामासाठी सरकारकडे निधी उपलब्ध होऊ  शकत नाही. विविध विकास कामे करणार्‍या ठेकेदारांची हजारो कोटींची बिले राज्यात आणि आपल्या जिल्ह्यातही  थकलेली आहेत.परिणामी ठेकेदारही त्रस्त आहेत.   
             खड्डे बुजवल्यानंतर अशी दुरुस्ती फार काळ टिकत नाही हे ठेकेदार आणि प्रशासनालाही ठाऊक आहे. त्यामुळे आता  गणरायाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला खड्डे बुजवण्याचे काम केले जाईल. तात्पुरता दिलासा देण्याचा हा प्रयत्न असेल. पुन्हा विसर्जनाच्या पूर्वी हेच काम नगरपरिषद करत असलेले  आपल्याला पाहायला मिळेल.
            हे कुठेतरी थांबायला हवे. खड्‌ड्यात कितीकाळ राहायचे याचाही विचार सर्वसंबंधितांनी करायला हवा !

Leave Your Comments