प्राचार्य डॉ.किरण सावे व उप प्राचार्य
डॉ. तानाजी पोळ यांचा उचित सन्मान
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांना मुंबई विद्यापीठांतर्गत ग्रामीण भागासाठीचा आदर्श प्राचार्य पुरस्कार घोषित झाला आहे. याच बरोबरीने महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ यांची मुंबई विद्यापीठाने आदर्श शिक्षक म्हणून निवड केली आहे. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी आणि सोनोपंत दांडेकर महाविद्यालय त्याचबरोबर या भागातील आजी- माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी, पालक आणि जिल्ह्यातील सर्वांसाठी ही एक आनंददायी आणि अभिमान वाटावी अशी घटना आहे. सर्वोत्कृष्ट प्राचार्य म्हणून झालेल्या निवडीने शिक्षण मंडळाने प्राचार्यपदी डॉ. किरण सावे यांची केलेली निवड सार्थ ठरवली आहे.”
डॉ.सावे मूळचे पालघर तालुक्यातील तारापूर येथील. तारापूर येथे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाला प्राचार्यांची एक थोर परंपरा आहे.सुरुवातीचे प्राचार्य डॉ. मो. दि. पराडकर त्यानंतर डॉ.लक्ष्मीकांत मंत्री यांचा वारसा सांगत त्यांनी तत्त्वज्ञान विषयात आपले उच्च शिक्षण घेतले आणि याच महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्यांना संधी मिळाली.तदनंतर अलीकडे २०१७ मध्ये त्यांची प्राचार्य म्हणून निवड झाली.त्याअगोदर डॅा. सावे आठ वर्षे उपप्राचार्य पदावर होते.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत समितीसह विविध शैक्षणिक समित्या व उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. अभ्यासू, विद्यार्थी आणि शिक्षकप्रिय, स्वभावाने मृदू आणि हसर्या चेहर्याचे व्यक्तिमत्व असलेल्या प्राचार्याचा अनेक विषयात व्यासंग आहे. त्यांचे वक्तृत्वही ओघवते आहे.ते उत्तम वाचक आहेत. प्राचार्य पदाची जबाबदारी आल्यानंतर प्रशासनिक कामामध्ये त्यांनी शिक्षण मंडळीसह आपले शिक्षक सहकारी तसेच पालक व विद्याथ्र्यांशी एक समन्वयाचे नाते निर्माण करत आपली स्वत:ची अशी छाप निर्माण केली आहे. विरार ते घोलवड दरम्यान पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाची एक स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख तशाच स्वरूपात जपण्याचे काम प्राचार्य सावे करत आहेत. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात या भागासाठी उपयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याचा वारसा त्यांनीही सुरू ठेवला आहे. याच बरोबरीने महाविद्यालयात केवळ महाविद्यालयिन नव्हे तर अन्य सामाजिक उपक्रम राबवण्यातही ते सहकार्याची भूमिका घेत असतात.त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एका अर्थाने प्राचार्य म्हणून तरुणपणीच त्यांना हा पुरस्कार मिळणे ही आणखी अभिमानाची बाब आहे. त्यांनी अनेक ठिकाणी शैक्षणिक- सामाजिक लेख लिहिले असून अनेक परिसंवाद, चर्चासत्र कार्यशाळांमध्येही सहभाग दिलेला आहे. अलीकडेच त्यांचे अंतरंगी डोकावताना,
याच महाविद्यालयाच्या उपप्रचार्यपदी असलेले डॉ.तानाजी पोळ हे १९९८ मध्ये महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि अलीकडे २०२३ मध्ये त्यांच्याकडे उपप्राचार्य पदाची जबाबदारी आली.तसेच ते राज्यशास्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.मुंबई विद्यापीठाच्या युरेशियन अभ्यास केंद्रातून त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली.अनेकदा दूरदर्शन वाहिनीवर आंतरराष्ट्रीय संबंधांवर भाष्य करण्याकरता त्यांना आमंत्रित केले गेले आहे.अनेक राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंधांचे वाचन त्यांनी केले आहे.विद्यावाचस्पती पदवीसाठी मार्गदर्शक म्हणूनही ते मार्गदर्शन करत असतात.डॉ. पोळ हे मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे सद्स्य आहेत.महाविद्यालयातील विद्याथ्र्यांना फ़्रेंच, जर्मन तसेच रशियन यांसारख्या परकीय भाषांतील विविध करियर संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी महाविद्यालयात सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्यात त्यांचा विशेष वाटा राहिला आहे.”आपले शिक्षक सहकारी व विद्याथ्र्यांमध्ये ते प्रिय आहेत.महाविद्यालयांमधील विविध उपक्रमांच्या यशस्वीतेमध्येदेखील त्यांचा नेहमीच वाटा राहिला आहे.प्राचार्य,उपप्राचार्य यांनी आपल्या अध्यापनाच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सेवा योजना पथकात कार्यक्रम अधिकारी म्हणून आपले योगदान दिले आहे.महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास हा दोघांचाही ध्यास राहिला आहे.
प्राचार्य डॉ. किरण सावे आणि उपप्राचार्य डॉ तानाजी पोळ यांचे नवयुग पालघरच्यावतीने हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कारकीर्दीसाठी अनेक सदिच्छा !