नवयुग पालघर Navyug Palghar
https://youtu.be/XonBrvHvQP4?si=hJUz0KTWPeKZGC6V
विक्रमगड येथे जनता दरबार : २७० हून अधिक निवेदनं, समस्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासन सज्ज – पालकमंत्री गणेश नाईक
पालघर दि. २४ सप्टेंबर –
“नागरिकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात धाव घेण्याची आवश्यकता नाही, स्थानिक पातळीवरच त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे,” असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड येथे आयोजित जनता दरबारात केले.
या जनता दरबारात नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण सुमारे २७० निवेदनं प्राप्त झाली. यामध्ये रस्ते, वीजपुरवठा, पाणी, शिक्षण व्यवस्था, शाळांची पडझड, आरोग्य सेवा, जमीन अधिग्रहण व मोबदला, ग्रामविकास, वनहक्क, टॉवर व गॅस पाईपलाईनसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर नागरिकांनी तक्रारी आणि मागण्या मांडल्या. यापैकी ७० टक्क्यांहून अधिक निवेदनांवर संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तात्काळ कार्यवाही सुरू करण्यात आली असून उर्वरित निवेदनं समयबद्ध पद्धतीने सोडवली जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्री नाईक यांनी स्पष्ट केले की, मागील काही वर्षांत विकासकामांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आल्या असून सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. “कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणे हीच शासनाची भूमिका आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय आरोग्य केंद्रांत आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवणे, शाळांमध्ये अपघात टाळण्यासाठी सुरक्षिततेची काळजी घेणे आणि नादुरुस्त रस्त्यांची कामे गतीने पूर्ण करणे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
या जनता दरबार प्रसंगी आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी भवानजी आगे पाटील, जव्हारचे उपवनसंरक्षक सैपुन शेख, डहाणूचे उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.