तारापूर/बोईसर औद्योगिक वसाहतीतील भागेरिया इंडस्ट्रीजमध्ये ओलियम वायू गळती; परिस्थिती पूर्ण नियंत्रणात –
जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड़
पालघर तालुक्यातील तारापूर/बोईसर औद्योगिक वसाहतीतील (MIDC) डी-झोन परिसरात प्लॉट क्र. D-17 वर कार्यरत असलेल्या भागेरिया इंडस्ट्रीजमध्ये Bhageria Industries Limited (पूर्वी झेनिथ) या रासायनिक उद्योगात २ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १:४५ ते २:०० वाजताच्या दरम्यान ६५ टक्के ओलियम (Oleum) रसायनाची गळती झाल्याची घटना घडली. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून गळतीचे मूळ ठिकाण शोधण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा डॉ. इंदु राणी जाखड़ व माधव तोटेवाड, सह संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य पालघर यांनी दिली.
*डे-टँकच्या लेव्हल इंडिकेटर ग्लासमधून गळती*
सदर कारखाना प्रामुख्याने डाय इंटरमीडिएट्स रसायनांच्या उत्पादनात गुंतलेला आहे. उत्पादन प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे २ ते २.५ केएल क्षमतेच्या आणि अंदाजे ६५ टक्के भरलेल्या ओलियम डे-टँकच्या लेव्हल इंडिकेटर ग्लासमधून गळती सुरू झाली. सुरुवातीला किरकोळ असलेली ही गळती वाढल्याने वातावरणात सल्फर ट्रायऑक्साइडयुक्त दाट रासायनिक धूर (फ्युम्स) पसरला.
दाट धुरामुळे कारखाना परिसरात दृश्यमानता अत्यंत कमी झाली होती. वाऱ्याच्या दिशेनुसार हे धुके दक्षिणेकडे सुमारे एक किलोमीटरपर्यंत पसरले. त्यामुळे प्रारंभी गळतीचे अचूक ठिकाण शोधण्यात बचाव पथकांना अडचणींचा सामना करावा लागला.
*तातडीची संयुक्त आपत्कालीन कार्यवाही*
घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, अग्निशमन दल, महसूल विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (DISH), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), आरोग्य विभाग तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांसह विविध यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जवळील उद्योगांच्या परस्पर सहाय्य प्रतिसाद Mutual Aid Response Group (MARG) पथकांनीही मदतीसाठी धाव घेतली. स्वयंपूर्ण श्वसन उपकरणे (Self-Contained Breathing Apparatus – SCBA) वापरून तज्ज्ञ पथकाने दुपारी सुमारे ३:४० वाजता गळती रोखण्याचे प्रत्यक्ष काम सुरू केले.
*तांत्रिक उपाययोजना; वाळू टाकून धूरनिर्मिती आटोक्यात*
जमिनीवर सांडलेले ओलियम अधिक पसरू नये व हवेतील ऑक्सिजनशी संपर्क होऊन पुढील रासायनिक अभिक्रिया होऊ नये, यासाठी तात्काळ मोठ्या प्रमाणावर वाळू टाकून ते पूर्णपणे झाकण्यात आले. या उपाययोजनेमुळे धूरनिर्मिती लक्षणीयरीत्या कमी झाली.
जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आणि आपत्कालीन पथकाच्या प्रयत्नांमुळे सायंकाळी सुमारे ६:३० वाजता परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आली.
*सुरक्षितस्थळी स्थलांतर; २,६०० हून अधिक जणांना हलविले*
सुरक्षेच्या दृष्टीने आसपासच्या उद्योग व संस्थांमधील कर्मचारी व विद्यार्थ्यांना तात्पुरते सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. त्यामध्ये आरती फार्मा, भगरिया इंडस्ट्रीज, आयव्हीपी (प्लॉट डी-१९), योगेश टेक्सटॉप, जगदीश कंपनी तसेच तारापूर विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांचा समावेश असून एकूण सुमारे २,६३८ जणांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले.
घटनेच्या वेळी कारखान्यात १५८ कामगार कार्यरत होते. सर्व कामगार सुरक्षित असून कोणालाही गंभीर इजा झालेली नाही.
*प्रकृती स्थिर*
घटनेदरम्यान काही नागरिकांना डोळ्यांत किरकोळ जळजळ जाणवली. त्यांना तात्काळ प्रथमोपचार देऊन बोईसर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच स्थानिक खासगी रुग्णालयांत उपचारासाठी पाठविण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असून जीवितहानी झालेली नाही.
*अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन*
सदर घटनेत कोणत्याही कामगार किंवा नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण झालेला नाही. परिस्थितीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड़ यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासन सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून पुढील घडामोडींबाबत वेळोवेळी अद्ययावत माहिती देण्यात येणार आहे.