नवयुग पालघर विशेष :
**जिल्हा रुग्णालय : सरकार, पालकमंत्री
व खासदार-आमदारांची उदासिनता !**
आमदार आणि भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आपल्या पालघर दौर्यात आरोग्य सेवा, अंगणवाडी इतर ठिकाणी भेटी दिल्यानंतर फेसबुकवर त्या संदर्भातील वास्तव मांडले. तदनंतर गेल्या आठवड्यात विधान परिषदेतही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य न करता या विषयावर लक्ष वेधले. पालघर जिल्ह्याच्या मांडलेल्या या व्यथा नवयुग पालघरच्या या अंकात प्रसिध्द झालेल्या आहेत. वसई मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनीही अधिवेशनात जिल्ह्याशी संबंधित काही प्रश्न उपस्थित केले. इतर आमदारांनीही आपापले मुद्दे मांडले असतील किवा यथावकाश मांडतीलही.
पालघर जिल्ह्याच्या दृष्टीने यातील महत्त्वाचे आणि मूलभूत प्रलंबित प्रश्न आहेत, पालघर जिल्हा रुग्णालय, मनोर येथील ट्रॉमा सेंटर,जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच अन्यत्र आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यात होत असलेली दिरंगाई. यातील जिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर हे निधी अभावी संथ गतीने वाटचाल करीत आहेत हे आता सर्वज्ञात आहे. अंदाजानुसार, ट्रॉमा सेंटरसाठी सुमारे २५ कोटी रुपयाचा निधी आवश्यक आहे तर जिल्हा रुग्णालयासाठी दीडशे ते दोनशे कोटी रुपयांची गरज आहे मात्र गेली अनेक वर्षे हा निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. पालघर येथील दौर्यात हा विषय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्र्यांनीही तसेच आश्वासन दिले. भाजप तसेच शिवसेना पक्षाच्या आमदारांनीही अनेकदा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडला आहे. काही महिन्यापूर्वी आरोग्यमंत्र्यांनी जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा सेंटरला भेट देऊन निधी उपलब्धतेचे आश्वासन दिले.पालकमंत्र्यांनीही अनेकदा संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करतो असे सांगितले.
तथापी, प्रत्यक्षात या दोन्ही महत्वाच्या रुग्णालयांची कामे किरकोळ निधी अभावी रखडलेली असून संथ गतीने सुरु आहेत. परिणामी जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक आरोग्य सेवांपासून वंचित राहावे लागत आहे. खासदारांनीही जिल्हा रुग्णालयासाठी केंद्रिय आरोग्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे परंतु त्यानंतरही प्रत्यक्षात दान हाती पडलेले नाही.
पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी आश्वासने वारंवार देण्यात येतात व आजही ती दिली जात आहेत.मात्र प्रत्यक्षात गेली दहा वर्षे मनोर येथील ट्रॉमा सेंटरचे काम रखडलेले आहे. एका बाजूला निधी अभाव तर दुसर्या बाजूला आवश्यक पदभरती आणि जिल्हा रुग्णालय व ट्रॉमा सेंटरसाठी आवश्यक उपकरणांच्या आवश्यक खरेदीबाबतही कोणतीही ठोस गती दिसत नाही.जिल्हा रुग्णालयाची परिस्थितीही याचप्रमाणे आहे. अलीकडे सामाजिक कृतिगटाने जव्हार येथे धरणे आंदोलन करून या महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. भूमी सेना-आदिवासी एकता परिषदेनेही देखील दोन दिवसापूर्वी चहाडे येथील बिरसा मुंडा चौक ते ट्रॉमा सेंटर पायी चालत जाऊन या प्रश्नावर आवाज उठवला. यापूर्वीही अनेकांनी विविध मार्गांनी हा प्रश्न मांडला आहे जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध होण्यापासून अडथळे निर्माण झाले असून हा प्रश्न सोडवण्यात देखील शासन आणि प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.
पालकमंत्र्यांचा जनता दरबार, खासदारांचा जनता दरबार, आमदारांच्या आढावा बैठका, नियोजन समितीच्या बैठका अशा विविध व्यासपीठावरून या प्रश्नांवर चर्चा झालेली आहे. परंतू परिस्थितीत अपेक्षित बदल झालेला नाही.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री,आरोग्य राज्यमंत्री आणि आमचे खासदार तसेच आमदार व सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी यांना हे प्रश्न खरोखर महत्त्वाचे वाटतात का ? किंबहुना या मूलभूत विषयांबाबत अपेक्षित संवेदनशीलता दिसत नाही, असेच चित्र उभे राहिले आहे. त्यामुळे आता नेमके करायचे तरी काय हा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्मण होणे स्वाभाविक आहे.
जिल्हावासिय म्हणताहेत, आम्ही न मागितलेली बुलेट ट्रेन आमच्यावर लादली जात आहे; आम्ही न मागितलेला मुंबई वडोदरा महामार्ग रेटून पुढे नेला जात आहे;वाढवण बंदरही असेच लादले जात आहे जिल्ह्याला विविध मार्गांनी जोडण्याची, विमानतळाशी जोडण्याची स्वप्ने दाखवली जात आहेत. परंतू जिल्ह्यासाठी आवश्यक असलेले जिल्हा रुग्णालय, ट्रॉमा सेंटर,उपजिल्हा रुग्णालय यांची गरज व मागणी करत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.सर्व स्तरावरील ही उदासिनता संपविण्यासाठी करावं तरी काय ?