**विरार-बोरीवली व विरार–डहाणू लोकलसेवांमध्ये मोठी तफावत ----- प्रवाशांचा प्रश्न – दोन मार्ग असूनही सेवा कमी का?**

Date: 2026-03-08
news-banner
नवयुग पालघर विशेष :

**विरार-बोरीवली व विरार–डहाणू लोकलसेवांमध्ये मोठी तफावत ----- 
प्रवाशांचा प्रश्न – दोन मार्ग असूनही सेवा कमी का?**

पश्चिम रेल्वेवरील उपनगरी रेल्वे सेवेबाबत विरारच्या पुढील भागातील प्रवाशांमध्ये मोठी नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे. विरार–बोरीवली आणि विरार–डहाणू या दोन विभागांमध्ये धावणार्‍या गाड्यांच्या संख्येत मोठी तफावत दिसून येत असल्याने यामागील तांत्रिक कारण काय, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. या संदर्भात डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने केलेल्या विश्लेषणातून ही बाब अधोरेखित झाली आहे.
संस्थेने उपलब्ध असलेल्या पश्चिम रेल्वेच्या २००८ सालच्या वेळापत्रकाचा (ऊऊ) अभ्यास केला असता काही महत्त्‌वाचे आकडे समोर आले आहेत. त्या काळात विरार ते चर्चगेट दरम्यान एकूण डाऊन ४५३ तर अप ४४७ लोकल धावत असत. चर्चगेट, दादर, वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली या स्थानकांपासून विरारपर्यंत म्हणजे बोरीवली–विरार दरम्यान ९८ लोकल, तर विरार–बोरीवली दरम्यान १०० लोकल धावत होत्या. म्हणजेच या दोन स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मिळून एकूण १९८ लोकल फेर्‍या होत होत्या.
त्याचवेळी मुंबई सेंट्रल, वांद्रे येथून सुटणार्‍या तसेच व्हाया वसई मार्गे येणार्‍या मेल-एक्सप्रेस, शटल, पॅसेंजर आणि लोकल गाड्यांचा विचार केला असता विरार–डहाणू दरम्यान अप-डाऊन मिळून १५४ गाड्या, तर विरार–बोरीवली दरम्यान एकूण ३१६ गाड्या धावत असल्याचे दिसून येते.
या सर्व आकडेवारीचे विश्लेषण केल्यास २००८ पर्यंत चर्चगेट ते बोरीवली दरम्यान चौपदरीकरण असलेला रेल्वे मार्ग कार्यान्वित होता, तर बोरीवली ते विरार आणि पुढे  डहाणूपर्यंत फक्त  दोनच रेल्वे मार्ग उपलब्ध होते. मात्र येथेच एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो. बोरीवली–विरार दरम्यान दोनच रेल्वे मार्ग असताना एकूण ३१६ गाड्या धावत होत्या, तर  विरार–डहाणू दरम्यान दोन मार्ग असूनही फक्त १५४ गाड्या धावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रवाशांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, एकाच प्रकारचे दोन मार्ग असलेल्या दोन विभागांमध्ये गाड्यांच्या संख्येत एवढी मोठी तफावत का?
दरम्यान, २००८ नंतरच्या परिस्थितीचा विचार केला असता आणखी वेगळे चित्र समोर येते. फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकानुसार सध्या एकूण १४१४ लोकल फेर्‍या चालवल्या जात आहेत. या कालावधीत  बोरीवली–विरार चौपदरीकरण पूर्ण झाले असून चार रेल्वे मार्ग कार्यान्वित आहेत. मात्र विरार ते डहाणू दरम्यान आजही केवळ दोनच रेल्वे मार्ग उपलब्ध आहेत. बोरीवली–विरार आणि विरार–डहाणू या विभागांमधून एकूण किती गाड्या धावत आहेत, याचे विश्लेषण संस्थेने केले आहे. यात लोकल, मेल-एक्सप्रेस, शटल, मेमू, पॅसेंजर, मालगाड्या आणि हॉलिडे स्पेशल गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. बोरीवली–विरार विभागातील मेन लाईनवरून धावणार्‍या मेल-एक्सप्रेस गाड्या पुढे विरार–डहाणू मार्गावरही जात असल्याने तुलना करताना फक्त लोकल गाड्यांचा विचार करण्यात आला आहे.
या विश्लेषणानुसार विरार–बोरीवली मेन जलद रेल्वे लाईनवरून किती लोकल आणि धीम्या लाईनवरून किती लोकल धावतात याची अचूक संख्या उपलब्ध नसली तरी २००८ सालच्या तुलनेत किमान अंदाजे २१० लोकल फेर्‍या बोरीवली–विरार दरम्यान होत असाव्यात, असे गृहीत धरण्यात आले आहे.
याउलट विरार–डहाणू मेन लाईनवरून फक्त ४२ लोकल फेर्‍या होत असल्याचे चित्र समोर येते. म्हणजेच फक्त लोकल गाड्यांचा विचार केल्यास २१० विरुद्ध ४२ अशी मोठी तफावत दिसून येते. २००८ मध्ये बोरीवली ते डहाणू दरम्यान सलग दोनच रेल्वे मार्ग असताना एकूण सरासरी ३१६–१५४ अशी गाड्यांची संख्या होती. तर २०२६ मध्ये फक्त लोकल गाड्यांच्या बाबतीत २१०–४२ असे समीकरण दिसते. हा विषय तांत्रिक दृष्ट्‌या गुंतागुंतीचा असला तरी सामान्य प्रवाशांच्या मनातील प्रश्न मात्र अद्याप कायम आहे.
यामुळे पुढील दोन प्रमुख प्रश्न उपस्थित होत आहेत – १) बोरीवली–विरार मेन रेल्वे मार्ग आणि विरार–डहाणू मेन रेल्वे मार्गामध्ये नेमका कोणता फरक आहे?
२) कोणत्या तांत्रिक कारणामुळे या दोन विभागांमध्ये धावणार्‍या गाड्यांच्या संख्येत इतकी तफावत दिसून येते?
        विरारच्या पुढील भागातील वाढती लोकसंख्या, वाढती प्रवासी संख्या आणि मर्यादित रेल्वे सेवा यामुळे या प्रश्नांची उत्तरे देण्याची आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची गरज अधिक तीव्र होत आहे. त्यामुळे या संपूर्ण विषयाकडे पश्चिम रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तांत्रिक बाबी स्पष्ट कराव्यात आणि प्रवाशांना दिलासा देणारे निर्णय घ्यावेत, अशी मागणी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेने केली आहे.
-----दयानंद पाटील, केळवेरोड

Leave Your Comments