नवयुग पालघर
ग्लोबल कोकण महोत्सव मध्ये ‘राजा रयतेचा’ महानाट्याचा मोफत विशेष प्रयोग
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीला नागरिकांसाठी खुला प्रवेश
पालघर, दि. १८ : शिरगाव (ता. पालघर) येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’त “राजा रयतेचा” या भव्य महानाट्याचा १९ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष मोफत प्रयोग सादर करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने हा प्रयोग सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुला करण्यात आला असून इतिहासप्रेमी व नागरिकांसाठी ही विशेष संधी ठरणार आहे.
दि. १८ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित या महोत्सवात दररोज सायंकाळी ७.३० ते रात्री १०.०० या वेळेत “राजा रयतेचा” महानाट्याचे प्रयोग होत आहेत. स्वराज्याची संकल्पना, रयतेच्या कल्याणासाठी झटणारे राजे आणि इतिहासातील प्रेरणादायी प्रसंगांची प्रभावी मांडणी या नाट्यातून साकारली जात आहे.
भव्य नेपथ्य, दिमाखदार वेशभूषा, आकर्षक प्रकाशयोजना आणि जिवंत अभिनय यामुळे हे महानाट्य प्रेक्षकांना थेट स्वराज्याच्या कालखंडात घेऊन जाते. कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचा जागतिक स्तरावर गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या महोत्सवात स्थानिक कला, खाद्यसंस्कृती आणि लोकपरंपरांचेही दर्शन घडत आहे.
शिवजयंतीच्या औचित्याने सादर होणाऱ्या या मोफत विशेष प्रयोगाचा नागरिकांनी लाभ घ्यावा व मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. इतिहासाच्या स्मरणातून प्रेरणा घेण्याची आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश देण्याची ही पर्वणी ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.