**आदिवासी भागातील माता-बाल मृत्यू रोखण्यासाठी गठीत जिल्हास्तरीय गाभा समितीची बैठक; प्रभावी अंमलबजावणीवर भर**

Date: 2026-02-24
news-banner
नवयुग पालघर विशेष : 
**आदिवासी भागातील माता-बाल मृत्यू रोखण्यासाठी गठीत जिल्हास्तरीय गाभा समितीची बैठक; प्रभावी अंमलबजावणीवर भर**

 आदिवासी बहुल भागातील माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी गठीत  जिल्हास्तरीय गाभा समितीच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत माता व बाल आरोग्याच्या विविध उपाययोजनांचा सखोल आढावा घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत साळुंके, आर.एम.ओ. डॉ. योगेश सुराळकर, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. वैदेही माळवी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन वाघमारे तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक आणि सर्व तालुक्यांचे तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

सभेत माता मृत्यू व बालमृत्यू कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी, उच्चजोखमीच्या गर्भवतींचे वेळेवर निदान व पाठपुरावा, संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविणे, नवजात बालकांसाठी विशेष नवजात अतिदक्षता विभाग (SNCU) बळकटीकरण तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
 २०२४-२५ या वर्षात माता-बाल संगोपन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पालघर जिल्ह्यातील SNCU विभाग राज्यात उल्लेखनीय कार्य करत असून, जव्हार येथील SNCU केंद्राने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी दिली.

तसेच, राज्यात सर्वाधिक प्रसूती करणारे प्रथम क्रमांकाचे प्राथमिक आरोग्य केंद्र सायवन (ता. डहाणू) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीतही पालघर जिल्ह्याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविल्याचा अभिमानास्पद उल्लेख बैठकीत करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्याबद्दल कौतुक करत आदिवासी भागातील माता-बाल आरोग्य सेवांमध्ये अधिक गुणवत्तापूर्ण, वेळेवर व संवेदनशील सेवा देण्याच्या सूचना केल्या. तसेच भविष्यातही समन्वयाने कार्य करून माता-बाल मृत्यूदरात लक्षणीय घट घडवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave Your Comments