**तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, युनिट-१ आयुर्मान वाढ उपक्रमानंतर पुन्हा ग्रीडला जोडले **

Date: 2026-02-25
news-banner

नवयुग पालघर Navyug Palghar Weekly
Special विशेष :

**तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, युनिट-१ आयुर्मान वाढ उपक्रमानंतर पुन्हा ग्रीडला जोडले **

तारापूर अणुऊर्जा प्रकल्प १ (TAPS-1) ने आपले आयुर्मान वाढीचा (Life Extension) कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केला असून या यशस्वीतेनंतर हे युनिट पुन्हा वीज ग्रीडला जोडण्यात आले आहे. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

१९६९ साली कार्यान्वित झालेले तारापूर अणुऊर्जा प्रकल्प १ आणि २ हे तत्कालीन अखंडित सोव्हिएत संघाबाहेरील आशियातील पहिले अणुभट्टी प्रकल्प होते. पाच दशकांहून अधिक काळ सुरक्षितपणे कार्य केल्यानंतर या युनिट्सना दुरुस्ती, आधुनिकीकरण आणि आयुरवृद्धी-व्यवस्थापन (Ageing Management) कामांसाठी तात्पुरते बंद करण्यात आले होते. तद्नंतर ही सर्व कामे कडक नियामक देखरेखीखाली पार पाडण्यात आली.

हा आयुर्मान वाढ कार्यक्रम जागतिक अणुसुरक्षा मानकांनुसार राबविण्यात आला असून त्यामध्ये अधिक सुरक्षितता मर्यादा (Enhanced Safety Margins) समाविष्ट करण्यात आल्या आहेत तसेच दीर्घकालीन कार्यक्षमतेची विश्वासार्हता अधिक बळकट करण्यात आली आहे.
मुख्य कामांमध्ये रिऍक्टरच्या रिसर्क्युलेशन पाईपिंगची गंजरोधक प्रगत साहित्याने (Advanced Corrosion-Resistant Material) बदली, 3D लेझर स्कॅनिंग, टर्बाइन-जनरेटर प्रणालीचे पुनर्बांधणी (Refurbishment), विद्युत प्रणालीतील सुधारणा इत्यादींचा समावेश होता.

युनिट क्रमांक २ मधील अशाच प्रकारची कामे अंतिम टप्प्यात असून ते युनिट लवकरच ग्रीडला जोडले जाण्याची अपेक्षा आहे.

या प्रकारच्या रिऍक्टरमध्ये इतकी गुंतागुंतीची आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक कामे यशस्वीपणे पूर्ण करणे हे Nuclear Power Corporation of India Limited (NPCIL) यांच्या अभियांत्रिकी कौशल्याचे आणि नूतनीकरण व आधुनिकीकरण (Renovation & Modernisation) क्षमतेचे द्योतक मानले जात आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प-१ आणि २ हे सध्या कार्यरत असलेले जगातील सर्वात जुने अणुभट्टी प्रकल्प आहेत.

आपल्या कार्यकाळात तारापूर अणुऊर्जा प्रकल्प १ आणि २  यांनी १,००,००० दशलक्ष युनिट्सपेक्षा अधिक स्वच्छ वीज निर्मिती केली असून त्यामुळे पर्यावरणात सुमारे ८६ दशलक्ष टन CO₂ समतुल्य वायू उत्सर्जन टाळण्यात आले आहे. या उच्चस्तरीय, गुंतागुंतीच्या आणि विशेष तांत्रिक कामांच्या यशस्वी पूर्णत्वामुळे एनपीसीआएलची तज्ज्ञता, परिपक्वता आणि सामर्थ्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

Leave Your Comments