बोईसरमधील रेल्वे फाटक : पर्यायी उपायांकडे दुर्लक्ष, नागरिक संतप्त

Date: 2025-08-29
news-banner
नवयुग पालघर २४ ऑगस्ट : 

बोईसरमधील रेल्वे फाटक : पर्यायी उपायांकडे दुर्लक्ष, नागरिक संतप्त

       बोईसर रेल्वे स्थानकाजवळील फाटकामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे. फाटक अनेक वेळा बंद राहिल्याने, परिसरातील रहिवाशांना त्यांच्या शाळा, हॉस्पिटल, ऑफिस आणि इतर महत्त्‌वाच्या ठिकाणी पोचणे कठीण होऊन बसते. विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचणे आव्हानात्मक ठरते, तर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचण्यास अडथळा येतो. व्यापारी, नोकरदार वर्ग आणि महिला देखील या समस्येने त्रस्त आहेत.वाहतूक वारंवार बंद पडल्यामुळे रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण होते आणि नागरिकांचा वेळ वाया जातो. या मार्गावरून पूर्व-पश्चिम अनेक गावांना जोडणार्‍या ग्रामस्थांना देखील मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.
         प्रशासनाकडे भुयारी मार्ग किंवा पादचारी पुलाची मागणी
करण्यात आली असली तरी, संबंधित विभागाकडून या पर्यायी उपायांकडे गांभीर्याने दुर्लक्ष केले जात आहे.वेळौवेळी आंदोलने करुन, निवेदने देऊनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. काही वेळा फाटक अचानक बंद केल्याने प्रवासी अडकतात आणि वाहतूक ठप्प होते. स्थानिक स्तरावरून हा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात असून, प्रशासनाने तात्काळ भुयारी मार्ग आणि पादचारी पुलासारखी सुरक्षित आणि सुयोग्य व्यवस्था करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. संपूर्ण बोईसर परिसरातील रहिवासी, व्यापारी, विद्यार्थी, महिला आणि वृद्ध, सर्वजण या समस्येवर  लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची मागणी करीत आहेत.

Leave Your Comments