https://youtu.be/ldHsyfq8gkE?si=hP78IL3teRHB1Auy
Navyug Palghar Weekly नवयुग पालघर विशेष बातमी :
सफाळेकरांना दिलासा : लोकशक्ती एक्सप्रेस पुन्हा थांबली!
पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सफाळेकरांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवाशांसाठी जीवनरेखा मानली जाणारी लोकशक्ती एक्सप्रेस ४ सप्टेंबर २०२५ पासून पुन्हा सफाळे स्थानकावर थांबू लागली आहे. कोरोनाकाळात थांबा रद्द झाल्याने अनेक प्रवाशांना होणारी दररोजची गैरसोय अखेर संपुष्टात आली.
या पुनःप्रारंभामुळे सफाळे व परिसरातील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, “सफाळेकरांच्या हक्काचा थांबा परत मिळाला” अशी भावना व्यक्त होत आहे.
अथक पाठपुराव्याचे फळ
हा ऐतिहासिक निर्णय खासदार डॉ. हेमंत सावरा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तसेच डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या अखंड पाठपुराव्यामुळे शक्य झाला. संस्थेने केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर दिल्लीतील रेल भवनापर्यंत धाव घेऊन मागणी लावून धरली. अखेर रेल्वे मंत्रालयाशी चर्चेनंतर हा थांबा पुन्हा मंजूर करण्यात आला.
स्वागत समारंभात जल्लोष
४ सप्टेंबर रोजी सफाळे स्थानकावर भव्य स्वागत सोहळा झाला. खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावीत, पश्चिम रेल्वेचे डीआरएम पंकज सिंग, वाणिज्य प्रमुख श्री. चव्हाण, डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नागदेव पवार, उपाध्यक्ष सतीश धर्मा गावड, सचिव दयानंद पाटील, स्थानिक समितीचे पदाधिकारी तसेच शेकडो प्रवासी उपस्थित होते.
या वेळी प्रवाशांनी मोटरमनचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खासदार सावरा यांचेही संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सत्कार केला.
प्रवाशांच्या मागण्या :
या सोहळ्यात प्रवाशांच्या अडचणींचाही उल्लेख करण्यात आला.
पिक अव्हरमध्ये डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविणे
काही लोकल गाड्या १५ डब्यांच्या करणे
दोन गाड्यांमध्ये तासाहून अधिक अंतर न ठेवणे
पादचारी पूल, एस्कलेटर, लिफ्ट, स्वच्छतागृह व प्रतिक्षालये उभारणे
नंदूरबार एक्सप्रेस (१९४२५/२६) ला वैतरणा येथे थांबा देणे
मान्यवरांचे अभिप्राय
“सफाळेकरांची मागणी ऐकली गेली, यश आपलेच आहे,” असे खासदार डॉ. सावरा म्हणाले. तर आमदार राजेंद्र गावीत यांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक करून प्रवाशांच्या मागण्या न्याय्य असल्याचे अधोरेखित केले.
लोकशक्ती एक्सप्रेसचा इतिहास
१९६६ साली अहमदाबाद जनता एक्सप्रेस म्हणून सुरू झालेल्या या गाडीला १९८६ मध्ये सफाळे येथे पहिला थांबा मिळाला. नव्हे डॉ. अमृते आणि सहकाऱ्यांच्या उपोषणामुळे हे साध्य झाले. डॉ. अमृते, वा. ग. वर्तक , भद्रेश शहा आदी जवळजवळ आठवडाभर उपोषणाला बसले होते आणि पश्चिम ठाणे जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष, माजी आमदार नवनीतभाई शाह, मृणालताई गोरे ,एडवणचे विनायक साखरे ह्यांनी सुद्धा ह्या गाडीला सफाळे येथे थांबा मिळावा म्हणून खूप प्रयत्न केले होते. त्यावेळच्या तात्कालिन रेल्वे मंत्री असलेल्या श्री.माधवराव शिंदे ह्यांनी अहमदाबाद जनता एक्सप्रेस (आताची लोकशक्ती एक्सप्रेस ) ह्या गाडीला सफाळे येथील थांबा देण्यास सहमती दर्शवली. तेव्हाही प्रवाशांच्या आंदोलनामुळेच हा निर्णय झाला होता. नंतर तिचे रूपांतर आजच्या २२९२७-२२९२८ लोकशक्ती एक्सप्रेस मध्ये झाले.
कोरोनाकाळात २२ मार्च २०२० रोजी सेवा बंद झाली. नंतर गाड्या सुरू झाल्या, पण सफाळेचा थांबा मात्र रद्दच राहिला. अखेर पाच वर्षांच्या संघर्षानंतर हा थांबा पुन्हा मिळाल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
👉 सफाळेकरांसाठी हा केवळ थांबा नाही, तर प्रवासातील सोय, वेळेची बचत आणि न्याय मिळाल्याचा क्षण आहे.
डहाणू-वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या धडपडीमुळे साध्य झालेले हे यश स्थानिकांसाठी अभिमानाचा विषय ठरले आहे.