सातपाटी किनाऱ्यावर तीन कंटेनर लाटांमुळे वाहून आले; समुद्री जीवसृष्टीला धोका, मच्छीमार बांधवांमध्ये चिंता

Date: 2025-09-08
news-banner



सातपाटी किनाऱ्यावर तीन कंटेनर लाटांमुळे वाहून आले; समुद्री जीवसृष्टीला धोका, मच्छीमार बांधवांमध्ये चिंता

पालघर : सातपाटी दांडीपाडा परिसरात समुद्राच्या लाटांमुळे तीन कंटेनर किनाऱ्यावर वाहून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे किनारपट्टीवर खळबळ उडाली असून स्थानिक मच्छीमार बांधवांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. प्राथमिक पाहणीत कंटेनरमध्ये ऑइल सदृश पदार्थ असल्याचे निदर्शनास आले आहे. गळती झाल्यास समुद्री जीवसृष्टी तसेच मच्छीमारांच्या उपजीविकेवर मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

ही घटना ७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता घडली. मौजे शिरगाव-ऊसभाव व मौजे सातपाटी दांडीपाडा गावाजवळ कंटेनर किनाऱ्यावर आल्याचे स्थानिक मच्छीमारांना प्रथम दिसले. त्यांनी तातडीने सातपाटी पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच सातपाटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीमाशुल्क विभाग, तटरक्षक दल, महाराष्ट्र समुद्र मंडळ तसेच वनविभाग यांच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. भरती-ओहोटीचा अंदाज लक्षात घेऊन क्रेनच्या सहाय्याने एक कंटेनर सुरक्षितपणे किनाऱ्यावर हलविण्यात आले असून उर्वरित दोन कंटेनर बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या कार्यवाहीदरम्यान पालघरचे पोलीस अधीक्षक  यतिश देशमुख (भापोसे) यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सातपाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि उद्धव सुर्वे तसेच इतर विभागाचे अधिकारी संयुक्तरीत्या कारवाई करत आहेत.

दरम्यान, मच्छीमार बांधवांमध्ये  चिंता निर्माण झाली आहे. कंटेनरमधील पदार्थ समुद्रात गळती झाल्यास माशांवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणत आहेत. तसेच या घटनेचा दीर्घकालीन परिणाम समुद्री पर्यावरणावर होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे.



Leave Your Comments