राष्ट्रीय महामार्ग-४८ची दयनीय अवस्था; पारशी समाजाने नितीन गडकरींकडे धाव घेतल्यानंतर तरी मंत्रालयाला जाग येणार का ?

Date: 2025-09-11
news-banner

https://youtu.be/3XVmj0FaVEs?si=HE_ZW3ttGrwWA9G
राष्ट्रीय महामार्ग-४८ची दयनीय अवस्था; 
पारशी समाजाने नितीन गडकरींकडे धाव घेतल्यानंतर तरी मंत्रालयाला जाग येणार का ?

दहिसर-तलासरीदरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग-४८ (एनएच-४८) दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा ठरत असून, या रस्त्याच्या दयनीय अवस्थेविरोधात सामान्यतः शांत राहणाऱ्या बॉम्बे पारशी पंचायतीने (बीपीपी) थेट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली आहे.

बीपीपीने आपल्या पत्रात म्हटले आहे की, हा महामार्ग दक्षिण गुजरातमधील उडवाडा येथील इराणशहा अग्नि मंदिर—पारशी समाजाचे सर्वात महत्वाचे तीर्थस्थान—यासाठी जाणारा एकमेव रस्ता आहे.मात्र हा "दहिसर ते तलासरी महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला( ‘डेथ ट्रॅप’) असून, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे  ज्येष्ठ नागरिकांसह साऱ्यांनाच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. आम्हाला फक्त चांगल्या रस्त्यांचा मूलभूत हक्क हवा आहे," असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

बीपीपीचे विश्वस्त आदिल मालिया यांनी सांगितले, “याच मार्गावरील वाईट परिस्थिती आणि वाहतूक अनियंत्रणामुळे आमच्या समाजातील नामवंत उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला. दहिसर-तलासरी मार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. भीषण अपघातांची मालिका सुरूच आहे.”

उडवाडा-मुंबईदरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्या फिल्ली बापुना यांनीही नाराजी व्यक्त करताना म्हटले, “एनएच-४८ वरून प्रवास करणे हा धोक्याचा आणि भयावह अनुभव असतो. काही महिन्यांपूर्वी टाकलेला सिमेंट-काँक्रीट रस्ता आज खड्ड्यांनी भरून गेला आहे. एका नवीन रेंज रोव्हर कारचे तर दोनदा टायर फुटले.”

सुरक्षित एनएच-४८ मोहिमेचे नेतृत्व करणारे डॉ. बुरजीस एच. डॉक्टर यांनी सांगितले, “या वर्षीच रस्ते कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे माझा जीव थोडक्यात वाचला. मी जेव्हा  पोलीस ठाण्यात तक्रार दिली, तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भारतीय रस्ते काँग्रेसचे नियम माहिती नसल्याचे पाहून धक्का बसला.”

वकील सुजय कांतावाला यांनी अनुभव सांगितला की, “बोईसर ते मुंबई प्रवास सहा तासांचा झाला. माझ्या बहिणीने शपथ घेतली आहे की आता ती फक्त रेल्वेनेच प्रवास करेल. तिने या महामार्गाला ‘पृथ्वीवरील नरक’ म्हटले आहे.”

महामार्ग कार्यकर्ते हरबन्ससिंह ननाडे यांनी लक्ष वेधले की, “या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ६०० कोटी रुपये खर्च करूनही परिस्थिती तीच आहे. अपघात आणि वाहतूककोंडी कायम असून, एनएचएआय आणि कंत्राटदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा वेळी बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन (बीआरओ) कडे हा मार्ग व ठाणे-घोडबंदर रस्त्याचे काम सोपवले पाहिजे, जेणेकरून प्रवास किमान सुरक्षित तरी होईल.”असे त्यांनी सुचविले.

दरम्यान, मंगळवारी दोन रुग्णवाहिका गुजरातकडे जाणाऱ्या लेनवर उलट दिशेने अडकलेल्या दिसल्या. वाहतूककोंडी पाहताच वाहनचालक समोरील लेनमध्ये घुसतात आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूचाही मार्ग ठप्प होतो, अशी परिस्थिती वाहनचालकांनी सांगितली.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे वर्षभराहून अधिक काळापासून प्रवासी व वाहतूकदार निकृष्ट दर्जाच्या कामामुळे दररोज जीवघेणा प्रवास करत असताना,एनएचएआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र “एनएच-४८ वर वाहतूककोंडीचे मुख्य कारण म्हणजे ठाणे-घोडबंदर रस्त्यावरील प्रचंड ट्रॅफिक असे कारण देऊन आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे.खड्ड्यांची समस्या आहेच, पण मुख्य अडथळा ठाणे-घोडबंदर मार्गावरील वाहनांची गर्दी आहे असे धडधडीत खोटे कारण सांगून ६०० कोटी खर्च करूनही या रस्त्यावर लगेच खड्डे का निर्माण झाले, अनेक ठिकाणी पावसाचे पाणी का साचते तसेच हा नवीन रस्ता उड्या मारणारा, उसळी घेणारा( jumping road ) का बनला आहे, याचे उत्तर ते देऊ मागत नाही. आपल्या पुढील खुलाशात या अधिकाऱ्याने, सध्या जुन्या पुलांवर मॅस्टिक टाकण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे.”




Leave Your Comments