राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी २५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी

Date: 2025-09-21
news-banner
नवयुग पालघर Navyug Palghar

राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी
२५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी

             राज्यातील इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी ऑनलाईन पद्धतीने राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. शैक्षणिक सत्र 2025-26 साठी आतापर्यंत 21 लाखांहून अधिक क्षमतेपैकी 13 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित झाला असला तरी उर्वरित रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे.

          या प्रवेश प्रक्रियेनुसार, २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन अर्जाची अंतिम फेरी सुरू होईल व २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ती चालणार आहे. याच कालावधीत अल्पसंख्याक, व्यवस्थापन व इतर राखीव कोट्यांतील प्रवेशही होतील. तसेच विद्यार्थी थेट २५ सप्टेंबरपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात जाऊनही प्रवेश घेऊ शकतील.

          राज्यातील एकूण प्रवेश क्षमता 21,59,232 इतकी आहे. यावर्षी 14,85,686 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 13,43,969 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-१ (नोंदणी) व भाग-२ (पसंती सूची) पूर्ण केला आहे. त्यातील 13,33,893 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. तरीही काही कारणास्तव रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी ही संधी देण्यात आली आहे.

        विद्यार्थ्यांनी व पालकांनी लक्षात ठेवावयाच्या सूचना :

        प्रवेश प्रक्रियेदरम्यान लॉग-इन करून माहिती तपासणे आवश्यक.
        आवश्यक कागदपत्रे अपलोड करून वेळेत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक.
        कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच प्रवेश अंतिम समजला जाईल.
         एकदा घेतलेला प्रवेश अंतिम असेल; वेळेत प्रवेश न घेतल्यास नंतर संधी मिळणार नाही.
            यासंदर्भात शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी  “आवश्यक कागदपत्रांसह महाविद्यालयात वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा संधी गमवावी लागू शकते.”असे म्हटले आहे तर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मनोज रानडे व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील यांनी पात्र विद्यार्थ्यांना वेळेत प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. 




Leave Your Comments