उमरोळी येथे तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प व फिरत्या संकलन वाहनाचे उदघाटन

Date: 2025-09-26
news-banner

https://youtu.be/GnRqiK8yLkg?si=3yz9eeg_VX6rJc_u
📰 उमरोळी येथे तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प व फिरत्या संकलन वाहनाचे उदघाटन

पालघर : ग्रामीण भागातील वाढत्या प्लास्टिक कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत उमरोळी ग्रामपंचायतीत तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा व प्लास्टिक संकलन फिरते वाहनाचा उदघाटन सोहळा शुक्रवारी (दि. २६ सप्टेंबर) पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

            या वेळी जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक  अतुल पारसकर, पंचायत समिती पालघरचे गटविकास अधिकारी  राहुल काळभोर, सहाय्यक गटविकास अधिकारी  बापूराव नाळे, विस्तार अधिकारी  शिंदे, उमरोळी ग्रामपंचायतीचे सरपंच  प्रभाकर पाटील, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी  मोरे, जिल्हा व पंचायत समिती कक्षातील कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           अविघटनशील प्लास्टिक कचरामुळे ग्रामीण रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, शेती, ओढे, नद्या, समुद्रकिनारे, पर्यटन स्थळे तसेच गावातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे ढिगारे दिसून येतात. यामुळे ग्रामीण भागाचे विद्रुपीकरण होत असून पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. हे रोखण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

          प्रकल्पाला जोडलेल्या ग्रामपंचायतींमधील प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करण्यासाठी सोमवार ते शनिवार दरम्यान निश्चित मार्ग आखण्यात आला आहे. यावेळी सीईओ  रानडे यांनी सर्व ग्रामपंचायतींना आपल्या हद्दीतील प्लास्टिक कचरा नियमितपणे प्रकल्पात जमा करण्याच्या सूचना दिल्या.


Leave Your Comments