बोईसर,तालुका जिल्हा पालघर, नगरपरिषद स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग

Date: 2025-09-11
news-banner
नवयुग पालघर ३१.०८/०७.०९

बोईसर नगरपरिषद स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग

 बोईसर ग्रामपंचायत व परिसरातील आठ ग्रामपंचायती एकत्र करून नगरपरिषद स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. या संदर्भातील सविस्तर अहवाल व परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी पालघर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक सोमवार ८ सप्टेंबर २०२५ रोजी  होणार आहे.आश्चर्याची बाब म्हणजे यापूर्वी प्रमाणेच जिल्हा परिषद व अन्य पंचायत समितीसोबत पालघर पंचायत समितीची निवडणूक केव्हाही घोषित होण्याची शक्यता असताना, बोईसर नगरपरिषद स्थापने संबंधात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झालेल्या आहेत.
 जिल्हा प्रशासनाने ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे उपअभियंता तसेच बोईसर, सरावली, पास्थळ, सालवड, खैरेपाडा, बेटेगाव, कोलवडे आणि कुंभवली या आठही ग्रामपंचायतींचे सरपंच यांना या बैठकीसाठी बोलावले आहे.
नगरपरिषद स्थापनेतली पाश्र्वभूमी
 तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात बोईसर नगरपरिषद स्थापनेबाबत निर्णय अंतिम टप्प्यात होता. मात्र पुढे काँग्रेस आघाडी सरकार गेल्यानंतर हा प्रस्ताव मागे पडला. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य गमवावे लागणार यासाठी राजकीय दृष्टया हा प्रस्ताव मागे पडला. अलीकडे जिल्हा परिषदेत हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती पुढे आली असली तरी यापूर्वीही असा प्रस्ताव मंजूर झाला होता, मात्र जिल्हा परिषदेच्या जव्हार तालुक्यातील एका सभेत इतिवृत्त वाचन दरम्यान हा प्रस्ताव समोर आल्यानंतर, असा प्रस्ताव मागील सभेत मंजूर झाला नव्हताच अशी भूमिका काही सदस्यांनी घेतली. तद्‌नंतर सभेनेही  त्यात आपला सूर मिसळला व इतिवृत्तात हा ठराव अमान्य करण्यात आल्याचे समजते.   
             एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या बोईसर व परिसरासाठी नगरपरिषद स्थापन करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत ३० ऑक्टोबर २०२४ रोजी मंजूर झाला आहे. पूर्वी जिल्हा परिषदेने विरोध दर्शविल्याने हा प्रस्ताव अडला होता. मात्र, ३० ऑक्टोबरच्या स्थायी समितीच्या बैठकीत आठही ग्रामपंचायती मिळून एकत्रित नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सादर करावयाचा सविस्तर अहवाल
 या प्रस्तावाला अंतिम रूप देण्यासाठी प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायती व विभागांकडून २०११ च्या जनगणनेनुसार तसेच सध्याच्या अंदाजे लोकसंख्येची माहिती,  एमआयडीसी कार्यरत नसल्याचे दाखले,  बोईसर ग्रामपंचायतीची स्थापना व कार्यकाळाची माहिती, ग्रामपंचायतींचे ठराव, नगरपरिषद क्षेत्राचा नकाशा व भौगोलिक सीमा, निर्गमित करावयाच्या उदघोषणेचे स्वरूप, नगररचना विभागाचे अभिप्राय, अकृषिक रोजगाराची टक्केवारी आदी तपशील मागवले आहेत.
 बोईसर परिसरातील औद्योगिक वाढ, लोकसंख्या घनता आणि शहरीकरणाच्या पाश्र्वभूमीवर नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून आहे. प्रस्तावित नगरपरिषदेसंदर्भात ८ सप्टेंबर रोजी होणार्‍या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीला सर्व संबंधित अधिकारी व सरपंचांनी परिपूर्ण माहिती सोबत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave Your Comments