नवयुग पालघर Navyug Palghar Weekly,
24 ऑगस्ट 2025
पालघर जिल्ह्यातील ठेकेदारांची आठशे कोटींची देयके थकल्याने कामे ठप्प, राज्यभर हीच परिस्थिती
पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विकासकामे थांबली असून, गेल्या आठ महिन्यांपासून कोणत्याही शासकीय विभागाने कंत्राटदारांना देयके दिली नसल्याच्या गंभीर आरोपांच्या पाश्र्वभूमीवर १९ ऑगस्ट रोजी पालघरसह, राज्यातील सर्व ३५ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयांपुढे कंत्राटदारांनी आक्रमक आंदोलन केले.एकट्या पालघर जिल्ह्यातील कंत्राटदारांची सुमारे ८०० कोटींची देयके थकली असल्याचे संघटनेचे सचिव अतुल घरत यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम, जलजीवन अभियान, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामविकास, जलसंपदा, जलसंधारण अशा जवळपास सर्वच विभागांचे प्रलंबित कामे निधीअभावी ठप्प पडली आहेत. यात केवळ कंत्राटदारांचेच नव्हे तर उपकंत्राटदार, मजूर संस्था, वाहतूकदार, साहित्य पुरवठादार आणि लाखो रोजंदारी कामगारांचा रोजगार धोक्यात आला असून ५ ते ६ कोटी लोकांच्या उपजीविकेवर गदा आली आल्याचा आरोप कंत्राटदारांच्या शंघटनेने केला आहे.
राज्य कंत्राटदार महासंघ, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, अभियंता संघटना, पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना, हॉट मिक्स असोसिएशन यासारख्या महत्त्वाच्या संघटनांनी एकत्र येऊन थकीत देयके द्या, कामे सुरू करा या मागण्यांसाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.
प्रकल्पांची मुदतवाढ दंडाशिवाय द्यावी, थकीत देयके व अनामत रक्कम परत द्यावी, कामासाठी आवश्यक निधीची उपलब्धता तातडीने करावी असे कंत्राटदार संघटनांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गेल्या पाच महिन्यांत मुख्यमंत्री व मंत्र्यांकडे वारंवार निवेदने दिली गेली, पण त्यावर ठोस निर्णय न झाल्यामुळे अखेर व्यापक आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे संघटनांनी म्हटले आहे. राज्याच्या विकासकामे ठप्प ठेवण्यामागील प्रशासनाची उदासीनता आणि शासनाची आर्थिक कोंडी यामुळे पुढील काळात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशारा ठेकेदार संघटनांनी दिला आहे.