नालासोपारा मतदारसंघ : बविआच्या वर्चस्वाला धक्का
नालासोपारा विधानसभा मतदारसंघात महायुती भाजप उमेदवार राजन नाईक यांनी तब्बल ०१ लाख ६५ हजार ११३ (४७.१६ टक्के) मते घेत बहुजन विकास आघाडीचे विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर यांचा ३६ हजार ८७५ मतांनी पराभव केला. क्षितिज ठाकूर यांना ०१ लाख २८ हजार २३८ (३६.६२ टक्के) इतकी मते मिळाली तर, महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार संदीप पांडे यांना केवळ १६ हजार ३५५ (४.६७टक्के) इतकी मते मिळाली. महाविकास आघाडीच्या उमेदवारापेक्षा येथे मनसे उमेदवार विनोद मोरे यांनी १६ हजार ९४९( ४.८४टक्के) इतकी मते मिळवून तिसरा नंबर राखला तर काँग्रेस पाचव्या नंबरवर फेकला गेला.प्रहार पक्षातर्फे निवडणूक लढवलेले धनंजय गावडे हे १४हजार ५६१ मते मिळवत चौथ्या क्रमांकावर गेले.त्यांना शिवसेना ठाकरे पक्षातील काही प्रमुखांनी मदत केली होती.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत महायुती भाजपचा टक्का ०.२९ टक्के इतका काहीसा वाढला आहे त्याचबरोबर बविआचा टक्का देखील सुमारे ०९.४टक्क्यानी वाढला आहे.मात्र मविआ अर्थात काँग्रेसची १७.९९ टक्के इतकी घसरण झाली आहे.२०१९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत बविआच्या मतात तब्बल १९.०८टक्के इतकी घट झाली आहे.त्यावेळी शिवसेना-भाजप एकत्रित मतांचा विचार करता यावेळी युतीचा टक्का ०७.७१ इतका वाढलेला दिसतो.या मतदारसंघात मतमोजणीत १९ फेर्या (प्रत्येकी २८ टेबल) पार पडल्या.यात १७ फेर्यांमध्ये महायुतीे आघाडीवर राहिले तर केवळ दोन फेर्यांमध्ये क्षितिज ठाकूर हे आघाडीवर राहीले.