पालघर मतदारसंघ :राजेंद्र गावित दुसर्‍यांदा आमदार

Date: 2024-12-02
news-banner
पालघर मतदारसंघ :राजेंद्र गावित दुसर्‍यांदा आमदार 
          पालघर विधानसभा मतदारसंघात महायुती शिवसेना शिंदे पक्षाचे राजेंद्र गावित यांनी ०१ लाख १२ हजार ८९४( ५२.६१%) मते घेत तब्बल ४० हजार ३३७ मतांनी नजीकचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे पक्षाचे जयेंद्र दुबळा यांचा पराभव केला. दुबळा यांना ७२ हजार ५५७ (३३.८१%) इतकी मते मिळाली. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार विराज गडग यांनी ४ हजार ८९ (१.९१ %) तर जिजाऊ उमेदवार विजया म्हात्रे यांनी ३ हजार ४९४ (१.६३ %) मते मिळवली. काँग्रेसमधून बंडखोरी केलेले मनोज दांडेकर यांना २ हजार १९०( १.०२ टक्के) इतकी मते मिळाली. तर मनसेचे उमेदवार नरेश कोरडा यांना १० हजार २५१ (४.७८ टक्के) इतकी मते मिळाली. गावीत हे पालघर विधानसभा मतदारसंघातून  दुसर्‍यांदा आमदार बनलेले आहेत.
          मतमोजणी २४ फेर्‍यांमध्ये पार पडली. यातील  तब्बल २१ फेर्‍यांमध्ये गावीतांचे मताधिक्य राहिले तर केवळ तीन फेर्‍यांमध्ये जयेंद्र दुबळा हे आघाडीवर होते.महायुतीच्या मतांत लोकसभेच्या तुलनेत ०५.५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर महाविकास आघाडीचे मताधिक्य देखील ०१.४५ टक्क्यांनी वाढले आहे.मात्र त्याचवेळी बहुजन विकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेली ११.८३ टक्के मते कोणाकडे वळली हा प्रश्न उपस्थित होतो. २०१९ च्या तुलनेत त्या वेळच्या एकत्रित शिवसेना व भाजपाला मिळालेल्या मतांचा विचार करता महाविकास आघाडीच्या मतात फारशी वाढ झाल्याचे दिसत नाही. याउलट महायुतीच्या मतात वाढ झाल्याचे दिसते. अपक्ष उमेदवार विराज गडग यांना यावेळी ४ हजार ८९( १.९१ टक्के) इतकी मते मिळाली तर विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये वंचिततर्फे निवडणूक लढविली असताना, त्यांना ११ हजार ४६९( ८.८६ टक्के) इतकी मते मिळाली होती. या विधानसभा निवडणुकीत मनसे उमेदवाराला १ हजार २५१ (४.७८ टक्के) इतकी मते मिळाली असून २०१९ च्या निवडणुकीत मनसेला १२ हजार ८१ (९.९१ टक्के) इतकी मते मिळाली होती. याचा अर्थ मनसेच्या मतांचा टक्काही निम्म्यावर आला आहे. ह्या मतदारसंघात अनेक ग्रामपंचायतीमध्ये मनसेने सत्ता मिळविली असतानाही हा टक्का घटला आहे.

Leave Your Comments