जिल्ह्यातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात

Date: 2024-12-03
news-banner
जिल्ह्यातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात

          पालघर जिल्ह्यांतर्गत पालघर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी डहाणू विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही मतदारसंघ महायुतीतील शिवसेना शिंदे पक्ष व भाजप या दोघांनी आपल्याकडे खेचून घेतले.डहाणू विधानसभा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडी माकपा उमेदवार विनोद निकोले यांनी भगवा दूर ठेवत आपला लालबावटा फडकवला.याउलट विक्रमगड मतदारसंघ भाजपाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून खेचून आणला. त्याचबरोबर वसई तालुक्यातील नालासोपारा व वसई  विधानसभा मतदारसंघ भाजपाने बहुजन विकास आघाडीकडून खेचून आणले.बोईसर विधानसभा मतदारसंघ जिंकून शिवसेना शिंदे पक्षाने या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीला पायउतार केले तर पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाचा पराभव करून शिवसेना शिंदे पक्षाने या मतदारसंघावर आपला ताबा मिळवला.
        २०१९ विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघात भाजपला स्थान मिळाले नव्हते.ती कमतरता भाजपाने पाच वर्षानंतर विक्रमगड,नालासोपारा व वसई हे तीन मतदारसंघ आपल्याकडे खेचून  भरून काढली.भाजपाने लढवलेल्या डहाणू मतदारसंघात मात्र भाजपाला हे यश आले नाही.तर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाने पालघर व बोईसर जागा आपल्याकडे ठेवत पाच मतदारसंघात महायुतीचा झेंडा फडकवला. पालघर लोकसभा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघांपैकी डहाणू, विक्रमगड, नालासोपारा व वसई हे चार मतदार संघ भाजपच्या वाट्याला आले होते तर पालघर व बोईसर हे दोन मतदारसंघ शिवसेना शिंदे पक्षाच्या वाट्याला आले होते. शिवसेना शिंदे पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या दोन्ही मतदारसंघात विजय मिळवला तर भाजपाला एका जागेवर पराभव स्वीकारावा लागला. मात्र उर्वरित तिन्ही मतदारसंघ भाजपने आपल्याकडे खेचून आणले.
         जिल्ह्यातील बोईसर, नालासोपारा, वसई या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीला पराभव पत्करावा लागला. बहुजन विकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे. सहा विधानसभा मतदारसंघ मिळून महायुती अंतर्गत लढवलेल्या चार जागा मिळून भाजपला ४ लाख ५६ हजार ७४९ मते मिळाली.तर लढवलेल्या दोन जागा मिळून शिवसेना शिंदे पक्षाचा मतांचा वाटा ०२ लाख ३९ हजार ११ इतका राहिला.तर शिवसेना ठाकरे पक्षाने दोन जागा लढवत ०१ लाख २३ हजार १२८ मते मिळविली.बहुजन विकास आघाडीने लढवलेल्या चार जागा मिळून २ लाख ८५ हजार ४३३ मते मिळवली.यात शेवटव्या दिवशी डहाणू मतदारसंघात बविआने माकपाला पाठिंबा जाहीर केला.लढवलेल्या एका जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला ७३ हजार १०६ मते मिळाली.व लढवलेल्या दोन जागा मिळून काँग्रेस पक्षाचा मतांचा वाटा ७८ हजार ६७९ इतका राहिला.

Leave Your Comments