महिलांचे आरोग्य म्हणजे सशक्त कुटुंबाचा पाया – खासदार डॉ. हेमंत सवरा
पालघर, दि. १७ (प्रतिनिधी):
“महिलांचे आरोग्य हेच सशक्त कुटुंब आणि मजबूत समाजाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभागी व्हावे,” असे प्रतिपादन खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केले.
देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” या उपक्रमाचा शुभारंभ आज पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात झाला. या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
“सेवा ही संकल्प, राष्ट्र प्रगती ही प्रेरणा” या भावनेतून राबविण्यात आलेल्या या अभियानांतर्गत महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग, एचआयव्ही, क्षयरोग, सिकल सेल, दंत तपासणी आदी विविध चाचण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच अंगणवाडी स्तरावर पूरक आहार पाककृती प्रदर्शन, पोषण शपथ, स्थानिक आहाराचा प्रसार, ॲनिमिया जनजागृती, योग व मानसिक आरोग्य उपक्रम आयोजित केले जातील.
या वेळी आमदार राजेंद्र गावित म्हणाले, “ग्रामीण भागातील महिलांना मोफत तपासण्या आणि पोषण सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मोठा लाभ असून तो प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे.”
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आवाहन केले की, “आरोग्य तपासण्या, पोषण सेवा आणि योजनांचा लाभ घेणे हीच खरी कुटुंबाची संपत्ती आहे. प्रत्येक महिला आणि बालकाने आपल्या जवळच्या आरोग्य केंद्र, अंगणवाडी किंवा आयुष्मान केंद्राशी संपर्क साधून या अभियानाचा फायदा नक्की घ्यावा.”
कार्यक्रमाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर, डॉ. उमेश दुम्पलवार, डॉ. दीप्ती गायकवाड यांच्यासह आशा ताई, अंगणवाडी सेविका व आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.