***नेहल मेहरची मुंबईच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड***

Date: 2026-07-14
news-banner
नवयुग पालघर

***नेहल मेहरची मुंबईच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड***

              बोईसर येथील तारापूर विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या नेहल मेहर या विद्याथ्र्याची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे शाळा, पालक, शिक्षकांसह तालुक्यात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
             ग्रामीण भागातील अत्यंत साध्या कुटुंबात वाढलेल्या नेहलच्या वाट्याला लहानपणापासूनच अनेक आर्थिक व सामाजिक अडचणी आल्या. क्रिकेटसाठी आवश्यक सुविधा, दर्जेदार साहित्य आणि प्रशिक्षण मिळवणे हे त्याच्यासाठी मोठे आव्हान होते. मात्र परिस्थितीपुढे हार न मानता त्याने जिद्द, मेहनत आणि सातत्य यांवर विश्वास ठेवला. प्रत्येक सराव, प्रत्येक सामना आणि प्रत्येक संधीचा 
उपयोग करत स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली.
रोजच्या कठोर सरावासोबत शिक्षणाचाही समतोल राखत नेहलने शालेय, जिल्हास्तरीय आणि विभागीय क्रिकेट स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली. फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि अष्टपैलू खेळातील त्याच्या प्रभावी प्रदर्शनामुळे निवड समितीचे लक्ष त्याच्याकडे वेधले गेले. अखेर त्याच्या मेहनतीला यश मिळाले आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या प्रतिष्ठेच्या अंडर-१९ संघात त्याची निवड जाहीर झाली.
            मुंबई १९ वर्षाखालील संघ हा प्रथम श्रेणी क्रिकेट, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि भारतीय संघात प्रवेश मिळविण्याचे प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे नेहलसमोरही आता आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मोठ्या व्यासपीठावर चमकण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
             तारापूर विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही विशेष प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असून, नेहलचे यश हे त्या क्रीडा संस्कारांचे आणि संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित मानले जात आहे.
           संस्थेचे विश्वस्त सतीश वालेकर तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. लिंडा जॉर्ज यांनी नेहलचे मनापासून अभिनंदन करत, त्याच्या  उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave Your Comments