**निपुण पालघर’ अंतर्गत ८ शिक्षक व ९ शाळांचा व १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव**

Date: 2026-03-05
news-banner

नवयुग पालघर विशेष : 
https://youtu.be/iWf09YReHqs?si=dPYi8iXH1nogNei3

**निपुण पालघर’ अंतर्गत ८ शिक्षक व ९ शाळांचा व १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव**

‘कॉफी विथ सीईओ’ उपक्रमातून निपुण पालघर गुणवंतांचा सन्मान

 ‘निपुण महाराष्ट्र’ अंतर्गत २३ शाळांचा, ‘निपुण पालघर’ अंतर्गत ८ शिक्षक व ९ शाळांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १६ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ‘कॉफी विथ सीईओ’ या विशेष उपक्रमातून जिल्हा परिषद, पालघर येथे करण्यात आला.

 शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘निपुण महाराष्ट्र’ व ‘निपुण पालघर गुणवत्ता विकास अभियान’ ( २०२५-२६) अनुषंगाने पारितोषिक वितरण समारंभ वीर बिरसा मुंडा सभागृहात उत्साहात पार पडला.

‘निपुण महाराष्ट्र’ अभियानांतर्गत शंभर टक्के गुण प्राप्त करणाऱ्या ९ ‘सुपर शाळा’ तसेच ९० ते ९९ टक्के गुण मिळविणाऱ्या १४ शाळांचा सन्मान करण्यात आला. ‘निपुण पालघर’ अंतर्गत गुणवत्तावाढीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ८ शिक्षक व ९ शाळांचा विशेष गौरव करण्यात आला.

विज्ञान, शैक्षणिक गुणवत्ता आणि सहशालेय क्षेत्रातील यशासाठी १६ विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये विज्ञान प्रदर्शनात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक, इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थी व शिक्षक, ‘इन्स्पायर अवॉर्ड’मध्ये यश संपादन करणारे विद्यार्थी तसेच मागील दोन वर्षांत राज्यस्तर व जिल्हास्तरावरील कला, क्रीडा स्पर्धा आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणारे विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा समावेश होता.

तसेच स्वच्छ व हरित विद्यालय मानांकन प्राप्त केलेल्या ८ शाळांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पाणीपुरवठा, स्वच्छ शौचालय सुविधा, साबणाने हात धुण्याची सवय, ऑपरेशन व देखभाल, वर्तन बदल आणि क्षमता बांधणी या निकषांवर आधारित सखोल मूल्यमापनानंतर शाळांची निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने यांनी प्रस्तावनेत उपक्रमामागील उद्दिष्टे स्पष्ट करत जिल्ह्यातील गुणवत्तावाढीचा आढावा समोर ठेवला. हा उपक्रम जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली .

“मुलांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीचे बीज आहे. अशा गौरवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना विविध क्षेत्रांत प्रगतीची प्रेरणा मिळते. संपूर्ण पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांच्या हातात आहे. त्यामुळे हा उपक्रम सातत्याने आणि प्रभावीपणे राबविणे आवश्यक असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यावेळी म्हणाले .

यावेळी डाएटचे प्राचार्य संभाजी भोजने तसेच जिल्हा समन्वयक तानाजी डावरे यांना विशेष योगदानाबद्दल गौरविण्यात आले.

कार्यक्रमास विनोबा ॲप ओपन लिंक फाउंडेशनचे श्रीकांत , उपशिक्षणाधिकारी ब्रीजेश गुप्ता, जिल्हा समन्वयक तानाजी डावरे, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील तसेच जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Your Comments