**“निर्भयतेचा संदेश देणाऱ्या ‘निर्भय बनो’ आंदोलनास ‘निर्भय पुरस्कार’” — वसईत ३३ व्या वर्धापन दिनी प्रेरणादायी सोहळा**

Date: 2026-03-30
news-banner
**“निर्भयतेचा संदेश देणाऱ्या ‘निर्भय बनो’ आंदोलनास ‘निर्भय पुरस्कार’”
— वसईत ३३ व्या वर्धापन दिनी प्रेरणादायी सोहळा**

            वसईतील ख्यातनाम निर्भय जनसंस्थेच्या वतीने यंदाचा २०२६ चा ‘निर्भय पुरस्कार’ समाजजागृतीसाठी कार्यरत ‘निर्भय बनो’ आंदोलनाला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी स्वीकारला.
           कार्यक्रमाचे अध्यक्ष वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोझा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात  ‘निर्भय बनो’ आंदोलन आणि निर्भय जनसंस्थेच्या कार्याचे कौतुक करत, समाजात निर्भयतेची भावना रुजविण्याची गरज अधोरेखित केली.
           प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत उत्तम कांबळे यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्माण होत असलेल्या दबावाचा उल्लेख करत, “भीतीच्या वातावरणात नागरिकांना जागृत करून भयमुक्त करण्याचे निर्भय जनसंस्थेचे कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे,” असे मत व्यक्त केले.
             कार्यक्रमाचे औचित्य साधून निर्भय जनसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या स्थानिक गुणवंतांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये तरुण क्रिकेटपटू आयुष म्हात्रे, झील डिमेलो, सिरिल गोन्साल्वीस, वसई जनहित ट्रस्ट, नानभाट आधार संघटना, योगगुरू मायकल परेरा, डॉमिनिक डायस आणि रॉबिन लोपीस यांचा समावेश होता.

Leave Your Comments