नवयुग पालघर
****विजेत्यांचा सन्मान,
विविध पातळ्यांवर
पालघरच्या खेळाडूंची चमक****
*भविष्यात व्यावसायिक क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्यातील खेळाडू मोठी झेप घेतील : खासदार सवरा*
**खेळाडूंना खेळासाठी सर्वतोपरी प्रोत्साहन देणार : जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड**
पालघर, दि. १० : , पालघर जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश हे क्रीडा शिक्षकांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांचे फलित आहे. यावर्षी ९८३ खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून त्यापैकी ४७ पदके जिल्ह्याच्या नावे जमा झाली आहेत. तसेच जागतिक योग स्पर्धेतही पालघरच्या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावत जिल्ह्याची मान उंचावली आहे. भविष्यात व्यावसायिक क्रीडा क्षेत्रातही जिल्ह्यातील खेळाडू मोठी झेप घेतील, असा विश्वास खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी व्यक्त केला. जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा परिषद सभागृहात आयोजित जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांच्या कार्यशाळा व बैठकीत ते बोलत होते.
तर जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. इंदू राणी जाखड यांनी राष्ट्रीय, राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील खेळाडूंचा गौरव करताना, जिल्ह्यातील क्रीडा चळवळीला आणखी बळ देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून खेळाडूंना आवश्यक ते सर्वतोपरी प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही दिली. गेल्या वर्षी जिल्ह्यातील तब्बल ६९ हजार विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग नोंदविल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी खेळाडूंनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सातत्यपूर्ण मेहनत घेतल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश निश्चित मिळू शकते, असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीस मान्यवरांची उपस्थिती
यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने, आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू गिरीश इर्नाक, जेएसडब्ल्यू सीएसआर प्रमुख सुधीर तेलंग, विजयराज, सुहास देशपांडे यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'यशासाठी त्याग आणि सातत्य आवश्यक'
डॉ. जाखड म्हणाल्या की, खेळाडूंना यश मिळविण्यासाठी अनेक गोष्टींशी तडजोड करावी लागते. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांनाही अनेक त्याग करावे लागतात. हीच जिद्द आणि त्याग खेळाडूला मोठ्या यशापर्यंत घेऊन जातात. जिल्ह्यातील आश्रमशाळा, सरकारी आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा सहभाग अधिक व्यापक व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून जिल्ह्यातील क्रीडा संकुलही लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व क्रीडा स्पर्धा पारदर्शक पद्धतीने आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
*राज्यस्तरावर ४७ पदके; जागतिक योग स्पर्धेत सुवर्णपदक*
*'यंदा अधिकाधिक शाळांचा सहभाग अपेक्षित'
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे म्हणाले की, गेल्या वर्षी सुमारे ७०० ते ७५० शाळांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. जिल्हा परिषदेच्या ३,३०० शाळांपैकी किमान ७०० ते ८०० शाळांनी यावर्षी सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच जिल्ह्यातील क्रीडा सहभागाचा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.
*विजेत्या खेळाडूंचा गौरव*
यावेळी आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सुवर्णपदक विजेता विधीश राऊत, तसेच राज्यस्तरीय पदक विजेत्या तनुशी गडग आणि भावना मीना यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण थोरात यांनी केले.