जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर संसदेचा शपथविधी; २२० विद्यार्थ्यांचा सहभाग

Date: 2026-07-29
news-banner
नवयुग पालघर 

****जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त करिअर संसदेचा शपथविधी; २२० विद्यार्थ्यांचा सहभाग****

तलासरी, दि. १५ : आदिवासी प्रगती मंडळ संचालित कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त 'करिअर कट्टा' आणि सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील नवनियुक्त विद्यार्थी करिअर संसदेचा शपथविधी कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

करिअर संसदेच्या मुख्यमंत्रीपदी अमन रांधे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच राज राजभर (संसदीय कामकाज), काजल बिरारी (उद्योजकता विकास), रेखा धांगडा (सामान्य प्रशासन), मेहुल शेलार (नियोजन), कुणाल हडळ (कायदे व शिस्तपालन), प्रणाली पाडवी (माहिती व प्रसारण), आरती गोरात (रोजगार), पल्लवी सुरूम (महिला व बालकल्याण), सोनू गुहे (कौशल्य विकास) आणि जय कश्यप (सदस्य) यांनी शपथ घेतली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान अ. राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. निलेश साळवे, करिअर कट्टा विभागप्रमुख प्रा. दीपाली भापकर, समन्वयक सहायक प्राध्यापक रितेश हटकर आणि सहायक प्राध्यापक अमोल दबडे उपस्थित होते.

प्रा. दीपाली भापकर यांनी प्रास्ताविकातून करिअर कट्टाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर नवनियुक्त विद्यार्थी करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांनी विद्यार्थी मंत्रिमंडळातील पदाधिकाऱ्यांना कर्तव्य व गोपनीयतेची शपथ दिली.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांनी विद्यार्थ्यांनी पदवीसोबत विविध कौशल्ये आत्मसात करून करिअरच्या संधी वाढवाव्यात, तसेच समाज आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्यांनी करिअर कट्टा अंतर्गत राबविण्यात येणारे ॲड-ऑन अभ्यासक्रम, यूपीएससी (UPSC) व एमपीएससी (MPSC) मार्गदर्शन वर्ग तसेच उद्योजकता विकास कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहनही केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक प्राध्यापक रितेश हटकर यांनी केले, तर आभार सहायक प्राध्यापक अमोल दबडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील २२० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Leave Your Comments