नवयुग पालघर
****आदिवासी अस्मितेचा जागर;
पालघर मुख्यालयात हजारोंची भव्य रॅली; जल-जंगल-जमीन, हक्क आणि संस्कृतीच्या रक्षणाचा गजर****
पालघर : जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीने रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, महापुरुषांना अभिवादन आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पालघर जिल्हा मुख्यालयात भूमिसेना, आदिवासी एकता परिषद तसेच विविध आदिवासी संघटनांच्या सहभागातून हजारोंच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील महिला-पुरुष, तरुण-तरुणी, बालकांसह मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी शहरातील वातावरण आदिवासी संस्कृतीच्या रंगात रंगवून टाकले. रॅली पाहण्यासाठी पालघर शहरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
रॅलीमध्ये ‘जल, जंगल, जमीन आमच्या अधिकाराची’, ‘आमच्या गावात, आमचं सरकार’ अशा घोषणांसह आदिवासींच्या हक्कांचा आवाज बुलंद करण्यात आला. पारंपरिक ढोल, तारपा आणि अन्य वाद्यांच्या तालावर तरुण-तरुणींचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला. पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि सांस्कृतिक सादरीकरणातून आदिवासी समाजाच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडले.
जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांकडेही यानिमित्ताने लक्ष वेधण्यात आले. आरोग्य, शिक्षण, रोजगार, जमीन आणि वनहक्क, वाढते प्रकल्प व त्यातून होणारे विस्थापन, पर्यावरणाचे संरक्षण तसेच आदिवासींच्या सांस्कृतिक वारशाचे संवर्धन या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
*मोखाड्यात पँथर्स आघाडीचा उपक्रम*
मोखाडा, जव्हार तालुक्यात स्थानिक विविध संघटना सह राष्ट्रीय पँथर्स आघाडीच्या वतीने जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ढोल, पारंपरिक गाणी, तारपा नृत्य आणि पारंपरिक वेशभूषेत झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण उत्साहपूर्ण झाले.
यावेळी ‘जल, जंगल, जमीन आणि आदिवासी संस्कृतीचे रक्षण’ करण्याचा संदेश देण्यात आला. संघटना अधिक मजबूत करून समाजातील प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक व्हावे, असेही यावेळी सांगण्यात आले.
*वाड्यात पारंपरिक कला-संस्कृतीचा जागर*
वाडा तालुक्यातही जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांतून आदिवासी समाजाच्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडले. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशे, तारपा नृत्य, लोककला आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी कार्यक्रमाला रंगत आली. आदिवासी समाजातील मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला.
*बोईसरमध्ये संघर्ष समितीतर्फे रॅली*
बोईसर येथे आदिवासी संघर्ष समितीतर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. काटकरपाडा येथून निघालेल्या पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या गजरातील रॅलीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या योद्ध्यांना अभिवादन करून त्यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले.
*मनोरमध्ये महापुरुषांना अभिवादन*
मनोर येथे क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा चौकात महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि आजीविकेच्या संरक्षणासाठी आवाज बुलंद करणाऱ्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले. यावेळी पारंपरिक वेशभूषेतील नागरिकांची उपस्थिती होती. आदिवासी संस्कृती जिवंत ठेवत पारंपरिक नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
*कासा, वसईसह विविध भागांतही कार्यक्रम*
कासा येथेही जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. महिला, पुरुष, तरुण-तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. ज्येष्ठांचा सन्मान, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रमांतून आदिवासी समाजाची एकजूट अधोरेखित झाली.
#जागतिकआदिवासीदिन #आदिवासीदिन #पालघर #पालघरजिल्हा #आदिवासीअस्मिता #जलजंगलजमीन #आदिवासीसंस्कृती #भूमिसेना #आदिवासीएकतापरिषद #मोखाडा #वाडा #बोईसर #मनोर #कासा #पालघरन्यूज
Follow Us : Facebook | Instagram | YouTube | X | WhatsApp Channel