नवयुग पालघर
***डहाणूतील न्यू लक्ष्मी ज्वेलर्सवरील सशस्त्र दरोडामधील तीन आरोपी जेरबंद, ५१.५१ लाखांचे दागिने हस्तगत***
पालघर, दि. २२ : डहाणू शहरातील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये दिवसा बंदुकीचा धाक दाखवून, गोळीबार करीत आणि सुर्याने दुकानातील काचा फोडून सुमारे ९० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व इमिटेशन ज्वेलरी लुटल्याच्या गंभीर प्रकरणाचा पालघर पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४२८.०५० ग्रॅम वजनाचे तब्बल ५१ लाख ५१ हजार १५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही घटना साधी चोरी नसून, दिवसा सशस्त्र पद्धतीने दुकानात घुसून दुकानदारावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करीत जबरदस्तीने ऐवज लुटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत तपासासाठी स्वतंत्र पथके नियुक्त केली होती.
*बंदुकीचा धाक, गोळीबार आणि सुर्याने तोडफोड*
२० जुलै २०२६ रोजी दुपारी ४.३५ ते ४.४५ वा.च्या दरम्यान ही घटना घडली होती. डहाणू इराणी रोडवरील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये काळ्या रंगाचे मास्क व काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेले, अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील तीन अनोळखी इसम घुसले. त्यांनी दुकानदार विनय कैलास सोनी (४६) यांना धाक दाखवून दुकानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटण्यास सुरुवात केली.
दुकानदाराने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच आरोपींपैकी एकाने जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील बंदुकीतून फिर्यादीच्या दिशेने गोळी झाड"ली. आरोपींकडे लाकडी मुठ असलेला मोठा लोखंडी सुराही असल्याचे दिसून आले. या सुर्याच्या सहाय्याने दुकानातील काचा फोडून तोडफोड करण्यात आली. त्यानंतर सुमारे ७०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ९० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरी लुटून आरोपी पसार झाले.
या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात कलम ३०९(४), १०९(१), ३२४(४), ३(५) तसेच आर्म्स ॲक्टमधील कलम ३/२५ आणि ४/२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
*वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट दखल; स्वतंत्र तपास पथके सक्रिय*
सशस्त्र पद्धतीने दिवसा घडलेल्या या गंभीर गुन्ह्याची विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मिना, पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे आणि डहाणू विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निशा जाधव यांनी विशेष दखल घेतली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा आणि डहाणू पोलिसांना तपासाच्या स्पष्ट सूचना दिल्या. आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली. गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि विविध तपास पद्धतींच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले.
*पहिला आरोपी २७ जुलैला, उर्वरित दोघे १३ ऑगस्टला जेरबंद*
तपासादरम्यान पोलिसांनी २७ जुलै रोजी यशवंत सदु चौधरी (४०) याला निष्पन्न करून अटक केली. तो सध्या नवकार रेसीडेन्सी, पटेलपाडा, डहाणू येथे राहत असून मूळचा कंक्राडी, डोंगरीपाडा येथील आहे.
त्यानंतर अटक आरोपीकडून मिळालेली माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली. या तपासातून दिपेश यशवंत गवळी (२२) आणि विशाल धाक्या चौरे (२३) या दोघांना १३ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. हे दोघेही दाभोण, लहांगेपाडा, पोस्ट ऐना, ता. डहाणू येथील रहिवासी आहेत.
तिघांकडे केलेल्या सखोल तपासानंतर त्यांच्याकडून लुटीतील ४२८.०५० ग्रॅम सोन्याचे दागिने, सुमारे ५१.५१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
*तपासात वाढीव कलमांचा समावेश*
या प्रकरणात २१ ऑगस्ट रोजी काही वाढीव कलमेही लावण्यात आली आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुर शेलार, डहाणू पोलीस ठाणे, करीत आहेत.
*प्रत्यक्ष कारवाईत सहभागी पथक*
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, तसेच डहाणू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंतदेसाई, रविंद्र, रोहित खोत, गोरखनाथ राठोड आणि राजेश वाघ, तसेच पोलीस हवालदार दिपक राऊत, सूर्यवंशी, संदीप सरदार, भगवान आव्हाड, कपिल नेमाडे, नरेंद्र, संजय धांगडा, दिनेश गायकवाड, कैलास पाटील, राकेश, संतोष निकोळे, दिलीप जनाठे आणि मुद्दसर दांडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच पोलीस नाईक कल्याण केंगार, पोलीस अंमलदार नरेश घाटाळ, वैभव जामदार, बजरंग अमनयाड आणि महेश अवतार, पोलीस अंमलदार चालक प्रशांत निकम, तसेच विशाल लोहार आणि विशाल कडव या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला. सायबर पोलीस ठाणे, पालघर येथील पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले तसेच पोलीस अंमलदार रूपेश पाटील, रोहित तोरस्कर आणि अक्षय शेट्टे यांनी तांत्रिक तपासात मोलाचे योगदान दिले.