नवयुग पालघर
https://youtu.be/U5wEyNRKOVk?si=gDROEnTabI6jFQAR
**सफाळ्यातील न्यूट्रिशन सेंटर फोडणारा आरोपी जेरबंद; चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत**
सफाळे : देवभूमी कॉम्प्लेक्समधील एका हेल्थ न्यूट्रिशन सेंटरचे शटर उचकटून टीव्ही आणि रोख रक्कम चोरणाऱ्या राजू बबलू मिश्रा या आरोपीला सफाळा पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून चोरीस गेलेला ५२ हजार ८०० रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
सफाळे येथील देवभूमी कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या हेल्थ न्यूट्रिशन सेंटरमध्ये २२ ऑगस्ट रोजी रात्री ते २३ ऑगस्ट रोजी पहाटेच्या दरम्यान ही घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्याने सेंटरचे शटर उचकटून आत प्रवेश केला. ऑनलाइन क्लाससाठी वापरण्यात येणारा ४८ हजार रुपये किमतीचा टीसीएल कंपनीचा ५२ इंची एलसीडी टीव्ही तसेच ४ हजार ८०० रुपये रोख रक्कम असा एकूण ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता.
याप्रकरणी विजय बाबू पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सफाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांना राजू बबलू मिश्रा (२२), रा. साई नंदनवन, भोईरपाडा, सफाळे याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
सपोनि/दत्ता शेळके, प्रभारी अधिकारी, सफाळा पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक दीपविजय भवर व ज्ञानेश्वर सावंत तसेच पोलीस अंमलदार कल्पेश किणी, शिवाजी चिमकर, भावेश देशमुख आणि रामदास ठाणगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस हवालदार केणी करीत आहेत.