नवयुग पालघर
*वाडा, विक्रमगडमध्ये एकलव्य निवासी शाळांचे उदघाटन **
पालघर, दि. ६ ऑगस्ट २०२६ : आदिवासी विद्यार्थ्यांना आधुनिक, दर्जेदार आणि निवासी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाडा आणि विक्रमगड येथे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सुरू करण्यात आले. शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, कलंभे येथे या शाळांचा आरंभ आणि विद्यार्थी स्वागत समारंभ झाला.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारच्या सहायक प्रकल्प अधिकारी दीपक टिके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षण अधिकारी, ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून दोन्ही शाळांचे उदघाटन करण्यात आले.
प्राचार्य मधुकर सरोदे यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलची उद्दिष्टे, निवासी सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाधारित अध्यापन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे पांडुरंग पटारे यांनी शाळांमधील विविध समस्यांकडे लक्ष वेधले. अध्यक्षीय भाषणात दीपक टिके यांनी संबंधित समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शिक्षण, शिस्त आणि गुणवत्तेला प्राधान्य देऊन उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन केले.
राष्ट्रीय आदिवासी छात्र समिती, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कलंभे आश्रमशाळेसह वाडा व विक्रमगड येथील एकलव्य शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भाग्यश्री चांदेवार यांनी केले, तर आभार अच्युत पाटील यांनी मानले.