नवयुग पालघर
***मतदारांना दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
पालघर जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत ‘नो मॅपिंग’ आणि ‘अॅनॉमली’ अशी नोंद असलेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रे संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे सादर करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले आहे. दावे-हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये कागदपत्रे जमा करणे आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार, १ लाख ८९ हजार ८०८ नोटिसांद्वारे मतदारांना कागदपत्रे सादर करण्याबाबत कळविण्यात आले असून, २७ हजार ७१ मतदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी प्राप्त झाली आहेत.
‘नो मॅपिंग’ किंवा ‘अॅनॉमली’ अशी नोंद झाल्याने मतदाराचे नाव यादीतून आपोआप वगळले जात नाही. संबंधित प्रकरणांची नियमानुसार पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता नोटिशीमध्ये नमूद केलेली कागदपत्रे वेळेत सादर करावीत.
दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
navyugpalghar.com
#पालघर #मतदारयादी #SIR #मतदारनोंदणी #दावेहरकती #निवडणूकआयोग #मतदारजागृती #महाराष्ट्र