****सफाळे येथे नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाला हिरवा कंदील; १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश****

Date: 2026-07-15
news-banner
नवयुग पालघर

****सफाळे येथे नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामाला हिरवा कंदील; १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश****

**सुमारे ₹४.१६ कोटींचा प्रकल्प; तळमजला + पहिला मजला अशी सुसज्ज इमारत, शस्त्रक्रिया कक्ष, प्रसूती विभाग, वॉर्ड, क्ष-किरण, सोनोग्राफीसह आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार**

पालघर, प्रतिनिधी : पालघर तालुक्यातील सफाळे येथील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी अखेर मार्गी लागली असून, नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी १४ जुलै रोजी कार्यारंभ आदेश जारी करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. 
.
या कामाची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, निविदा ०.१५५ टक्के कमी दराने मंजूर करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹४.१६ कोटी (GST - वस्तू व सेवा कर) वगळून खर्च अपेक्षित असून, आदेशानुसार १२ महिन्यांच्या आत संपूर्ण बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.

आराखड्यानुसार हे रुग्णालय तळमजला  व पहिला मजला  अशा दोन स्तरांवर उभारण्यात येणार आहे. एकूण १,८१८.०१ चौ.मी. बांधकाम क्षेत्र असून त्यात तळमजल्याचे क्षेत्रफळ १,३९४ चौ.मी., पहिल्या मजल्याचे ३८६.१७ चौ.मी. आणि ३७.८४ चौ.मी. पोर्चचा समावेश आहे.

*तळमजल्यावर सर्व प्रमुख आरोग्य सेवा*

रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रशस्त पोर्च, 
नोंदणी कक्ष, मोठा प्रतीक्षा कक्ष, औषध वितरण कक्ष , वैद्यकीय साठा कक्ष , तसेच रुग्णवाहिका पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल.

*याशिवाय तळमजल्यावर खालील विभागांची सुविधा असेल :
वैद्यकीय अधिकारी कक्ष
वैद्यकीय बाह्यरुग्ण विभाग (Medical OPD)
स्त्रीरोग व प्रसूती बाह्यरुग्ण विभाग (OBGY OPD)
आयुष बाह्यरुग्ण विभाग (Ayush OPD)
दंतचिकित्सा बाह्यरुग्ण विभाग (Dental OPD)
नेत्र तपासणी विभाग (Refraction OPD)
एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (ICTC)
लसीकरण व शीतसाखळी विभाग (Cold Chain)
इंजेक्शन व ड्रेसिंग कक्ष
किरकोळ शस्त्रक्रिया कक्ष (Minor OT)
सोनोग्राफी कक्ष
क्ष-किरण कक्ष (X-Ray)
विकृतिविज्ञान प्रयोगशाळा (Pathology), नमुना संकलन कक्ष (Sample Collection) व रक्तसाठा केंद्र (Blood Store)
अहवाल कक्ष (Reporting Room) व डार्क रूम (Dark Room)
स्वतंत्र महिला, पुरुष व दिव्यांग स्वच्छतागृहे.
शस्त्रक्रिया व प्रसूतीसाठी स्वतंत्र विभाग
रुग्णालयात आधुनिक शस्त्रक्रिया कक्ष (Operation Theatre) उभारण्यात येणार आहे. त्यासोबत शस्त्रक्रियापूर्व कक्ष (Pre-Operative Room), शस्त्रक्रियेनंतरचा कक्ष (Post-Operative Room), निर्जंतुकीकरण स्वच्छता विभाग (Scrub Area), निर्जंतुक साहित्य साठा (Sterile Store), स्वच्छ व अस्वच्छ लिनेन कक्ष, पुरुष कपडे बदल व महिला कपडे बदल कक्ष ( Male changing ward -Female changing ward , तसेच परिचारिका केंद्र (Nurse Station) अशी संपूर्ण सुविधा उपलब्ध असेल. तसेच प्रसूती विभागात स्वतंत्र निर्जंतुक विभाग (Sterile Zone), स्वच्छ विभाग (Clean Zone), तटस्थ विभाग (Neutral Zone) यांसह सर्व आवश्यक सुविधा प्रस्तावित आहेत.

*महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्ड*
आराखड्यानुसार रुग्णालयात महिला वॉर्ड आणि पुरुष वॉर्ड स्वतंत्रपणे उभारले जाणार असून त्यासोबत स्वतंत्र स्नानगृहे व स्वच्छतागृहे असतील. तसेच वॉर्डबॉय कक्ष, अल्पोपहार कक्ष , विद्युत नियंत्रण कक्ष (Electrical Control Room), लिफ्ट शाफ्ट  आणि उतारमार्ग (Ramp) यांचीही सुविधा देण्यात आली आहे.

*पहिल्या मजल्यावर प्रशासकीय व प्रशिक्षण सुविधा*
पहिल्या मजल्यावर बहुउद्देशीय सभागृह, कर्मचारी कक्ष , प्रशासकीय अधिकारी कक्ष, परिचारिका कक्ष , साठा कक्ष , महिला व पुरुष स्वच्छतागृहे, दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह आणि भविष्यातील विस्तारासाठी प्रशस्त टेरेसची तरतूद करण्यात आली आहे.

*कामासाठी अटी*:
कार्यारंभ आदेशात कंत्राटदारासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये कामाची मुदत १२ महिने असून १२० महिन्यांचा (१० वर्षे) दोष दायित्व कालावधी आहे. बांधकामस्थळी किमान ५० वृक्षांची लागवड करावयाची असून तृतीय पक्षामार्फत गुणवत्तेची तपासणी केली जाणार आहे.

सफाळे व परिसरातील नागरिकांना अनेक वर्षांपासून सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची गरज होती. नवीन इमारतीमुळे अत्याधुनिक तपासणी, शस्त्रक्रिया, प्रसूती सेवा, निदान सुविधा, प्रयोगशाळा आणि स्वतंत्र वॉर्ड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये धाव घेण्याची गरज कमी होण्यास मदत होईल. तसेच प्राथमिक व दुय्यम आरोग्य सेवांवरील ताण कमी होऊन पालघर तालुक्यातील हजारो नागरिकांना याचा थेट लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave Your Comments