https://youtu.be/uanYqZvBsLk?si=a2S3dRCNGOdt-kXo
***आलिशान कार तसेच खाद्यपदार्थाच्या आडून सुरू असलेल्या दारू तस्करीचा पर्दाफाश; जव्हारमध्ये 33.84 लाखांचा मुद्देमाल जप्त***
नवयुग पालघर | जव्हार
लगतच्या केंद्रशासित प्रदेशातून आलिशान कार तसेच खाद्यपदार्थाच्या आडून पिकअप वाहनातून महाराष्ट्रात विदेशी दारूची चोरटी वाहतूक केली जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने जव्हार तालुक्यात एकाच वेळी दोन ठिकाणी सापळा रचून धडक कारवाई केली. या कारवाईत 184 बॉक्स विदेशी दारू, एक महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप आणि एक फोर्ड एंडेव्हर कार जप्त करण्यात आली असून एकूण 33 लाख 84 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सीमावर्ती भागात अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी दिवसरात्र गस्त आणि करडी नजर ठेवली होती. त्याच दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डहाणू विभाग आणि पालघर भरारी पथकाने संयुक्त कारवाई केली.
जव्हार-खानवेल रोडवरील विशाल ढाब्यासमोर तसेच जव्हार-खंबाळे रोडवरील रातुना फाट्याजवळ संशयित वाहनांना अडवून तपासणी करण्यात आली. यावेळी GJ-03/BZ-8783 क्रमांकाच्या महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअपमध्ये खाद्यपदार्थाच्या आडून, तर MH-43/X-1889 क्रमांकाच्या फोर्ड एंडेव्हर या आलिशान कारमधून दादरा आणि नगर हवेली येथे विक्रीसाठी असलेली व महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी दारू वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले.
या कारवाईनंतर तीन आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. जप्त करण्यात आलेला संपूर्ण मद्यसाठा दादरा आणि नगर हवेली राज्यात विक्रीसाठी असलेला असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.
जप्त मुद्देमाल
दारू
184 बॉक्स विदेशी दारू – ₹14,84,040
वाहने
महिंद्रा बोलेरो मॅक्स पिकअप (GJ-03/BZ-8783) – ₹9,00,000
फोर्ड एंडेव्हर (MH-43/X-1889) – ₹ १०,00,000
एकूण जप्त मुद्देमाल
₹33,84,040
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक गणेश बारगजे आणि उपअधीक्षक अविनाश रणपीसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहभागी अधिकारी:
प्रत्यक्ष कारवाईत निरीक्षक सुनिल देशमुख (राज्य उत्पादन शुल्क, डहाणू), निरीक्षक अरुण चव्हाण (भरारी पथक, पालघर), दुय्यम निरीक्षक राजेश शिंदे, विश्वजीत आभाळे, विकास आबनावे, अभिजित मानकर, टी. व्ही. सावेकर तसेच जवान अमोल नलावडे, संदीप अहिरे, ओमकार शेजवळ, दीपक शेवाळे, प्रतीक गांगुर्डे, वाहनचालक शशिकांत पाटील आणि इतर अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.
या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सुनिल देशमुख आणि निरीक्षक अरुण चव्हाण करीत आहेत.