विद्यावर्धिनीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात (वसई)'टीसीएस टेक्नॉलॉजी डे २०२६' उत्साहात संपन्न*

Date: 2026-07-18
news-banner
नवयुग पालघर
****विद्यावर्धिनीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात (वसई)'टीसीएस टेक्नॉलॉजी डे २०२६' उत्साहात संपन्न****
*एआय, क्लाऊड तंत्रज्ञान, हॅकाथॉन आणि 'लीडरशिप कनेक्ट'द्वारे विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाचा थेट अनुभव; टीसीएसचे २० हून अधिक तज्ज्ञांचे मार्गदर्शन**

पालघर | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत त्यांच्यातील कौशल्यविकासाला चालना देण्याच्या उद्देशाने वसई येथील विद्यावर्धिनीच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात १५ जुलै २०२६ रोजी 'टीसीएस टेक्नॉलॉजी डे २०२६' चे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा अधिक दृढ करण्याच्या हेतूने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)च्या तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमासाठी टीसीएसचे जागतिक मनुष्यबळ व्यवस्थापन प्रमुख समीर राजाध्यक्ष, एआय आर्किटेक्ट व वरिष्ठ अधिकारी बी. वेंकटरमणन तसेच शैक्षणिक सहयोग विभागाच्या प्रादेशिक प्रमुख स्नेहा वाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आयोजित 'लीडरशिप कनेक्ट' या विशेष सत्रात उद्योग क्षेत्रातील वेगाने होत असलेले बदल, आधुनिक तंत्रज्ञान आणि भविष्यातील करिअरसाठी आवश्यक कौशल्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि क्लाऊड तंत्रज्ञान या विषयांवर तज्ज्ञांनी सविस्तर व्याख्याने दिली.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी क्लाऊड तंत्रज्ञानावरील हँड्स-ऑन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता हॅकाथॉन स्पर्धेने झाली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण कल्पना, समस्या सोडविण्याची क्षमता आणि तांत्रिक कौशल्यांचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड संगणन तसेच उद्योगांच्या अपेक्षांबाबत थेट तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी टीसीएसचे २० हून अधिक तंत्रज्ञान तज्ज्ञांनी महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राकेश हिमते यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण व प्लेसमेंट समितीने केले. तसेच या उपक्रमासाठी विद्यावर्धिनी ट्रस्टचे अध्यक्ष विकास वर्तक यांचे मार्गदर्शन लाभले.
🌐 अधिक बातम्यांसाठी: navyugpalghar.com
#NavyugPalghar #Palghar #Vidyavardhini #TCS #TechnologyDay2026 #Engineering #AI #CloudComputing #Hackathon #LeadershipConnect #Innovation #Education #Career #Technology



Leave Your Comments