कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात 'सुपा फार्म रोटरी एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६' सोहळा संपन्न

Date: 2026-07-29
news-banner

नवयुग पालघर 

****कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात 'सुपा फार्म रोटरी एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६' सोहळा संपन्न****

तलासरी : विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर न थांबता आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन माजी रोटरी इंटरनॅशनल अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांनी केले. कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात आयोजित 'सुपा फार्म रोटरी एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६' सोहळ्यात ते बोलत होते.

तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात रोटरी क्लबच्या वतीने 'सुपा फार्म रोटरी एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६' सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या १५३ गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी रोटरी इंटरनॅशनल अध्यक्ष कल्याण बॅनर्जी, उद्योगपती डॉ. मोहनभाई पटेल, रोटरी क्लबचे अध्यक्ष तेजस सुरा, महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. बी. ए. राजपूत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

प्रास्ताविकात डॉ. बी. ए. राजपूत यांनी उपक्रमाची माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात तेजस सुरा यांनी रोटरी क्लबच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ. मोहनभाई पटेल यांनी परिश्रम, सातत्य आणि निष्ठेच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला.

मुख्य अतिथी कल्याण बॅनर्जी यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणातून मिळालेले ज्ञान समाजहितासाठी वापरावे, असे सांगत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते १५३ गुणवंत विद्यार्थ्यांना 'रोटरी एक्सलन्स अवॉर्ड' प्रदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना पेन व छत्र्यांचेही वाटप करण्यात आले.

कार्यक्रमास रोटरी क्लबचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Your Comments