****पालघरमध्ये एस्सार (ESSAR ) साठी
तब्बल 1,215 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाचा प्रस्ताव;
नेमका प्रकल्प कोणता , हे अद्याप अस्पष्ट ****
**महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या पत्रातून सहा गावांतील जमिनीचा प्रस्ताव उघड;
प्राथमिक पाहणी झाल्याची महामंडळाची कबुली**
एस्सार कॅपिटल ऍडडवायझरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (M/s. ESSAR Capital Advisory India Pvt. Ltd.) करिता पालघर तालुक्यातील उसरणी, दांडा (उसरणी), खटाळी, मधुकर नगर, मथाणे आणि भादवे या सहा गावांतील सुमारे १,२१५.९४२४ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाच्या प्रस्तावाची माहिती समोर आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या अधिकृत पत्रातून ही माहिती समोर आली आहे. मात्र, हा प्रस्ताव नेमका कोणत्या प्रकल्पासाठी आहे, कोणत्या उद्योगासाठी ही जमीन आवश्यक आहे आणि त्याचा अंतिम उद्देश काय आहे, याबाबत पत्रात कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
१८ जून २०२६ रोजी महामंडळाच्या ठाणे-१ प्रादेशिक कार्यालयातून महा व्यवस्थापक (भूसंपादन) , औद्योगिक विकास महामंडळ-मुंबई यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात एस्सार कॅपिटल ऍडडवायझरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसाठी संबंधित गावांचा एकत्रित जमीन प्रस्ताव (Consolidated Proposal) सादर करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पत्रात खाजगी व सरकारी जमिनीचे स्वतंत्र क्षेत्रफळ देण्यात आले असून एकूण सुमारे १,२१५.९४२४ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असल्याचे दिसून येते.(तक्त्यात गाव निहाय क्षेत्र दिले आहे). मात्र या पत्रात सर्व्हे नंबर नमूद नसल्याने सरकारी जमीन कोणती व खाजगी जमीन कोणती, तिचे मालक कोण या प्रश्नाने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
याच पत्रात यापूर्वी २६ मे २०२६ च्या पत्रान्वये उसरणी, दांडा(उसरणी), खताळी व मधुकर नगर येथील खाजगी क्षेत्र ६५८.४४५७ व सरकारी क्षेत्र १७३.४३२१ मिळून एकत्रित ८३१.८७७८ हे. आर क्षेत्राचा भूसंपादनाचा प्रस्ताव मुख्यालयास पाठविण्यात आला होता असे नमूद करण्यात आले असून १,२१५.९४२४ हेक्टर क्षेत्राचा
प्रस्ताव नव्याने पाठविण्यात येत असल्याचे म्हटले आहे. याच बरोबरीने संबंधित जमिनींचे ७/१२ उतारे तसेच ६ गावातील जमिनीचा एकत्रित नकाशा पाठविण्यात आल्याचेही म्हटले आहे.
याच पत्रात मुंबई कार्यालयाकडून ठाणे कार्यालयाकडे प्राप्त १५ जून २०२६ च्या पत्राचा व ठाणे कार्यालयाने मुंबई कार्यालयाकडे १२ जून २०२६ रोजी पाठविलेल्या पत्राचा संदर्भ दिला आहे. यातून यातील पाठपुराव्यातील सातत्य तसेच लगबग देखील अधोरेखित होत आहे.
मात्र, या पत्रात ऑइल रिफायनरी, पेट्रोकेमिकल, ऊर्जा, बंदर, औद्योगिक पार्क किंवा अन्य कोणताही प्रकल्प असा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे नेमका कोणता उद्योग उभारण्याचा विचार सुरू आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, एस्सार कॅपिटल ऍडडवायझरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड , औद्योगिक विकास महामंडळ तसेच स्थानिक प्रशासनाच्या समन्वयातून या परिसरातील जमिनींची प्राथमिक पाहणी (Preliminary Survey) करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ठाणे व तारापूर कार्यालयाने अशी पाहणी झाल्याचे म्हटले आहे. मात्र या प्रकल्पाबद्दल अन्य कोणतीही माहिती नसल्याचेही ते म्हणाले.
यापुढील प्रक्रिया म्हणून संबंधित प्रस्तावावर उच्चाधिकार समिती High Power Committee (HPC) स्तरावर विचार होऊन पुढील निर्णय घेतला जातो. समितीच्या शिफारशीनंतरच पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू होते .
दरम्यान, अशा स्वरूपाच्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पासाठी केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या उद्योग विभागाची धोरणात्मक मान्यता अथवा तत्त्वतः संमती मिळाल्याशिवाय प्राथमिक स्तरावरील सर्वेक्षण, जमीन प्रस्तावांची आखणी आणि विविध विभागांतील समन्वयाची प्रक्रिया सुरू होणे सहसा शक्य नसते, अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. तथापि, यासंदर्भात शासन किंवा कंपनीकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.तसेच महसूल विभागाकडे या संबंधात कोणतीही माहिती नसल्याचे निवासी उप जिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी सांगितले.
यामुळे आता या प्रस्तावामागील नेमका उद्योग कोणता आणि पालघरमध्ये कोणत्या स्वरूपाची मेगा गुंतवणूक प्रस्तावित आहे, हे पुढील सरकारी प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, वाढवण येथे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय बंदराच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावाकडे अधिक लक्ष वेधले जात आहे. बंदरात भविष्यात मोठ्या प्रमाणावर बल्क क्रूड ऑईल (Bulk Crude Oil) व इतर पेट्रोलियम पदार्थांची आयात होण्याची शक्यता लक्षात घेता, एस्सार (ESSAR) समूहाच्या ऑइल रिफायनरी किंवा पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ही जमीन प्रस्तावित असू शकते, अशी चर्चा स्थानिक स्तरावर सुरू आहे. मात्र, उपलब्ध महामंडळाच्या पत्रात अथवा अन्य कोणत्याही अधिकृत कागदपत्रात यासंदर्भात स्पष्ट उल्लेख नसल्याने या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
गावनिहाय जमिनीचे क्षेत्र दर्शविणारा तक्ता :
***///1) उसरणी : खाजगी क्षेत्र (हे.आर.) 346.8307/ सरकारी क्षेत्र (हे.आर.) 108.7560 / एकूण क्षेत्र (हे.आर.) 455.5867
2) खटाळी : खाजगी क्षेत्र (हे.आर.)112.2270 / सरकारी क्षेत्र (हे.आर.) 40.1831 / एकूण क्षेत्र (हे.आर.) 152.4101
3) दांडा (उसरणी) : खाजगी क्षेत्र (हे.आर.) 114.3460 / सरकारी क्षेत्र (हे.आर.) 20.4300 / एकूण क्षेत्र (हे.आर.)
134.7760
4) मधुकर नगर : खाजगी क्षेत्र (हे.आर.) 83.4280 / सरकारी क्षेत्र (हे.आर.) 5.0230 / एकूण क्षेत्र (हे.आर.)
88.4510
5) भादवे : खाजगी क्षेत्र (हे.आर.) 110.3735 / सरकारी क्षेत्र (हे.आर.) 2.2180 / एकूण क्षेत्र (हे.आर.) 112.5915
6) मथाणे : खाजगी क्षेत्र (हे.आर.) 222.7400 / सरकारी क्षेत्र (हे.आर.) 49.2951 / एकूण क्षेत्र (हे.आर.) 272.0351
एकूण : 6 गावे : खाजगी क्षेत्र (हे.आर.) 989.9452 / सरकारी क्षेत्र (हे.आर.) 225.9052/ एकूण क्षेत्र (हे.आर.) 1215.9424 ///***
**एस्सार कॅपिटल ऍडवायझरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही , प्रकल्प सल्लागार (Advisory), गुंतवणूक व्यवस्थापन (Investment Advisory), व्यवसाय नियोजन (Business Strategy), आर्थिक व्यवहार आणि कॉर्पोरेट सल्ला देणारी कंपनी आहे. ही कंपनी २०१९ मध्ये नोंदणीकृत झाली असून तिचे कार्य सल्लागार स्वरूपाचे आहे.
उपलब्ध नोंदींनुसार एस्सार कॅपिटल ऍडवायझरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही Essar Group / Essar Capital च्या समूहाशी संबंधित कंपनी आहे. Essar Capital हे Essar Global Fund चे गुंतवणूक व्यवस्थापक (Investment Manager) असून समूहातील विविध ऊर्जा (Energy), पायाभूत सुविधा (Infrastructure), धातू व खाण (Metals & Mining), तंत्रज्ञान (Technology) आदी क्षेत्रांतील प्रकल्पांसाठी धोरणात्मक आणि आर्थिक सल्ला देते.
मोठ्या प्रकल्पांचे आर्थिक व व्यवहार्यता विश्लेषण (Financial & Feasibility Advisory)जमीन संपादन (Land Acquisition) प्रक्रियेसाठी समन्वयक किंवा सल्लागार म्हणून काम करू शकते.
सरकारी परवानग्या, नियामक प्रक्रिया आणि प्रकल्प नियोजनात मदत करते.
गुंतवणूक, वित्तपुरवठा आणि कॉर्पोरेट व्यवहारांबाबत सल्ला देते.**