माहीम ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचे वर्चस्व कायम; मुकेश करबट उपसरपंच

Date: 2026-08-19
news-banner
नवयुग पालघर

**माहीम ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचे वर्चस्व कायम; मुकेश करबट उपसरपंच**

पालघर : माहीम ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुकेश करबट विजयी झाले. विरोधकांचे प्रयत्न अपयशी ठरवत करबट यांनी  उपसरपंचपद मिळविले आहे. त्यामुळे माहीम ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे.

मंगळवारी झालेल्या निवडणुकीत मुकेश करबट यांना १३ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिंदे गटाचे कुणाल नारले यांना ४ मते मिळाली. एक मत बाद झाले. या निकालामुळे करबट यांची उपसरपंचपदी निवड निश्चित झाली.

माहीम ग्रामपंचायतीच्या २०२३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रीती अरुण पाटील सरपंचपदी, तर नरोत्तम राऊत उपसरपंचपदी निवडून आले होते. अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नरोत्तम राऊत यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी ही निवडणूक घेण्यात आली.

करबट यांच्या विजयानंतर शिवसेना सहसंपर्कप्रमुख विकास मोरे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अजय ठाकूर,  सरपंच प्रीती पाटील, माजी उपसरपंच नरोत्तम राऊत, सदस्य रॉकी तांडेल, मनीष पाटील, अभिजित पाटील, अरुण पाटील, निर्मिता राऊत, रुचिता चुरी आदी उपस्थित होते.

Leave Your Comments