नवयुग पालघर
**सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या डॉ. शीला पाईकराव (गोडबोले) यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयीन ग्रंथपाल पुरस्कार**
पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. शीला राजकुमार पाईकराव (गोडबोले) यांची ग्रंथालय व माहितीशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत प्रोफेसर व्ही. आर. दाडगे लायब्ररी फाउंडेशन, लातूर यांच्या वतीने २०२६ चा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट महाविद्यालयीन ग्रंथपाल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दाडगे लायब्ररी फाउंडेशनचे सचिव प्रा. नितीन दाडगे यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात संस्थापक अध्यक्ष प्रा. विजयकुमार मिश्रा, प्रमुख अतिथी प्रा. सी. आर. जोशी, प्रमुख पाहुणे मिर्झा नदवी तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माहिती व ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक आणि दाडगे लायब्ररी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जगदीश कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. पाईकराव यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या रा. हि. सावे ग्रंथालयाच्या माध्यमातून दुर्गम व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी डॉ. पाईकराव यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. ‘ग्रंथ आपल्या दारी’, ‘शाळेपर्यंत ग्रंथालय’ आणि ‘ह्युमन लायब्ररी’ यांसारख्या उपक्रमांसह कोविड काळात रुग्णालयातील रुग्णांसाठी वाचन उपक्रमही त्यांनी राबविला. या माध्यमातून वाचनसंस्कृतीची व्याप्ती वाढविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
ग्रंथालयशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी ग्रंथालयाचे संगणकीकरण तसेच विविध डिजिटल सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि ग्रंथालयातील ज्ञानसंपदा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या त्यांच्या कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.
पुरस्काराबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. पाईकराव यांनी आपल्या ग्रंथालयीन कार्यात सातत्याने सहकार्य, मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे संस्थेचे अध्यक्ष सीए. सचिन कोरे व सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य प्रा. डॉ. तानाजी पोळ, उपप्राचार्य डॉ. महेश देशमुख, ग्रंथालय समितीचे सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रंथालयातील सहकारी यांचे आभार मानले.
‘हा पुरस्कार माझ्या एकट्याच्या कार्याचा गौरव नसून, माझ्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहिलेल्या संपूर्ण महाविद्यालयीन व ग्रंथालय परिवाराच्या सामूहिक प्रयत्नांचा सन्मान आहे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ. शीला पाईकराव (गोडबोले) यांच्या या निवडीबद्दल सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, ग्रंथालय समिती, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रंथालय कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
🌐 navyugpalghar.com
📱 Facebook | X | YouTube | Instagram
#नवयुगपालघर #Palghar #DrSheelaPaikrao #Library #Librarian #Award #Education #ReadingCulture #DandekarCollege #PalgharNews #राज्यस्तरीयपुरस्कार #ग्रंथपाल #वाचनसंस्कृती