नवयुग पालघर ***
‘चला शाळेत जाऊया’ अभियानातून शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा
८ व ९ सप्टेंबर रोजी ‘चला शाळेत जाऊया’ अभियानांतर्गत पीएम श्री शाळा नवली, जिल्हा परिषद शाळा मनोर मराठी व उर्दू, जिल्हा परिषद शाळा सवादे, जिल्हा परिषद शाळा दादडे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जव्हार आणि जिल्हा परिषद शाळा काळीधोंड या शाळांना राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई संजय यादव आणि विभागीय उपसंचालक (शिक्षण), मुंबई राजेंद्र कंकाळ यांनी भेटी देत, पालघर जिल्ह्यातील शाळांची थेट पाहणी केली. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा, शिक्षकांचे अध्यापन, शाळेतील पायाभूत सुविधा आणि विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासत शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक बाबींची नोंदही त्यांनी केली.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृहे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, संरक्षक भिंत, हँडवॉश स्टेशन, विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पुरेशा वर्गखोल्या, विद्युत दिवे व पंखे, पिकअप रूम आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे यांसारख्या सुविधांची पाहणी या दरम्यान करण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. तसेच शाळेतील उपलब्ध साधनसुविधांचा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कितपत उपयोग होत आहे, याचीही माहिती घेण्यात आली.
शिक्षणाच्या गुणवत्तेलाही प्राधान्य
शाळेतील भौतिक सुविधांबरोबरच विद्यार्थी प्रत्यक्षात काय आणि किती शिकत आहेत, याकडेही पाहणीदरम्यान लक्ष देण्यात आले. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, मूलभूत शिक्षणाची स्थिती आणि विविध शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी यांचा आढावा घेण्यात आला.
यामध्ये निपुण महाराष्ट्र, परख सर्वेक्षण, विद्या समीक्षा केंद्र, दीक्षा पोर्टल, शाश्वत विकास उद्दिष्टे (SDG), नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT), UDISE+, जयंंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम आणि प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना यांचा शाळांमध्ये होणारा उपयोग तपासण्यात आल्याचे नमूद केले आहे.
पालघर जिल्ह्यासाठी संजय यादव नोडल अधिकारी
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शाळांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात ‘चला शाळेत जाऊया’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जिल्हानिहाय नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यासाठी संजय यादव, राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, पीएम श्री शाळा, आदर्श शाळा तसेच खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांना भेटी देऊन शाळांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली जात आहे.
शाळा भेटीवेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोनाली मातेकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक पाटील, शिक्षणाधिकारी योजना शेषराव बडे आणि डायटचे प्राचार्य संभाजी भोजने उपस्थित होते.
९ सप्टेंबर रोजी अभियानांतर्गत जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्ह्यातील शाळांना मिळणारा सीएसआर निधी, आवश्यक आर्थिक मदत, शाळांच्या विकासासाठी करावयाच्या उपाययोजना, प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचे सनियंत्रण यांसह विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. तसेच नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT), कार्यमान प्रतवारी निर्देशांक (PGI), आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रम (ADP व ABP), शाश्वत विकासाची ध्येये (SDG), निपुण महाराष्ट्र आणि परख सर्वेक्षण यांसह विविध निर्देशांकांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत संजय यादव यांनी SDG India Indexच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रातील निर्देशांकांचे विश्लेषण करून आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. तुलनात्मकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतींचा (Best Practices) अभ्यास करून महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी उंचावण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले.
आकांक्षित जिल्हा व तालुका कार्यक्रमांतर्गत उपलब्ध निधीचा उपयोग शाळांमधील उणिवा दूर करण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्राधान्याने करण्याचे आवाहन करण्यात आले.
सक्षम शाळा • गुणवत्तापूर्ण शिक्षण • उज्ज्वल विद्यार्थी
#चला_शाळेत_जाऊया #पालघर #शिक्षण #शैक्षणिकगुणवत्ता #विद्यार्थी #शिक्षक #पालक #शाळा #पालघरजिल्हा #गुणवत्तापूर्णशिक्षण
Instagram | X | Facebook | YouTube