**जव्हारमध्ये दोन दिवसीय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न**

Date: 2026-02-24
news-banner

नवयुग पालघर विशेष :

**जव्हारमध्ये दोन दिवसीय क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न**

 प्रकल्पस्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील संघभावना, परस्पर समन्वय आणि कार्यऊर्जा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने आयोजित दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाचा समारोप उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात झाला. जव्हार शहरातील भारतरत्न राजीव गांधी मैदान येथे रंगलेल्या या स्पर्धांमध्ये क्रीडाभावना, टीमवर्क आणि सकारात्मक स्पर्धेचा संगम अनुभवायला मिळाला.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समारोप सोहळा प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. विविध सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना चषक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) सुभाष परदेशी यांनी प्रास्ताविकातून स्पर्धा आयोजनामागील उद्दिष्टे स्पष्ट केली. नियोजन प्रक्रियेत आलेले अनुभव, सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य आणि प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली जबाबदारी यांचा त्यांनी मार्मिक आढावा घेतला. आयोजनादरम्यान झालेली धावपळ आणि त्यातून साधलेले यश विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आले.

कबड्डी, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, धावणे, हँडबॉल आणि क्रिकेट अशा विविध क्रीडा प्रकारांमध्ये सामने रंगले. सांघिक स्पर्धांमध्ये विजयी संघांना चषक प्रदान करण्यात आले, तर वैयक्तिक प्रकारांतील विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक स्पर्धेत उत्साहपूर्ण सहभाग आणि क्रीडाभावना प्रकर्षाने जाणवली.

अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. अपूर्वा बासूर यांनी यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. “सर्वांच्या चेहऱ्यांवरील समाधान आणि उत्साह पाहता स्पर्धेचा उद्देश सफल झाल्याचे स्पष्ट दिसते,” असे त्या म्हणाल्या. दहावी-बारावीच्या परीक्षा कालावधीमुळे काही शिक्षकांना सहभागी होता आले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली; मात्र भविष्यात अधिक व्यापक सहभाग अपेक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले.

या समारोप सोहळ्यास सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्रकल्प कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी सोमनाथ शेवाळे यांनी आभार प्रदर्शन केले. अखेरीस ‘वंदे मातरम्’ राष्ट्रगीत सामूहिकरित्या सादर करून प्रेरणादायी वातावरणात क्रीडा महोत्सवाची सांगता करण्यात आली.



Leave Your Comments