नवयुग पालघर
****पालघर जिल्ह्यात १७ लाख मतदारांचे गणना अर्ज डिजिटलायझेशन पूर्ण; पैकी तब्बल १.९० लाख नोंदींमध्ये त्रुटी/विसंगती (‘अॅनॉमलीज’); ६.६९ लाख मतदारांचे ईएफ संकलनाबाहेर***
पालघर, दि. १९ ऑगस्ट : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील एकूण २३ लाख ७६ हजार ०५३ मतदारांपैकी १७ लाख ०७ हजार ०५७ मतदारांचे गणना अर्ज (ईएफ) डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७१.८४ टक्के काम पूर्ण झाले असले, तरी डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेत १ लाख ९० हजार ५६२(११.१६%) नोंदींमध्ये त्रुटी किंवा विसंगती (अॅनॉमलीज) आढळून आल्या आहेत. त्यामुळे नोंदींमधील त्रुटी-विसंगती दूर करण्याचे कामही एसआयआर प्रक्रियेत महत्त्वाचे ठरणार आहे.
याशिवाय, जिल्ह्यातील ६ लाख ६८ हजार ९९६ मतदारांचे (२८.१६%)q ईएफ संकलनाबाहेर (Uncollectable) राहिले आहेत. या मतदारांचा शोध घेताना ते मृत, अनुपस्थित, शोधूनही न सापडलेले किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे आढळल्याने त्यांचे ईएफ संकलित होऊ शकलेले नाहीत.
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये एसआयआरची स्थिती वेगवेगळी राहिलेली आहे. डहाणू विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ०६ हजार ६३९ मतदारांपैकी २ लाख ७६ हजार ४७२ मतदारांचे ईएफ डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून, त्याचे प्रमाण ९०.१६ टक्के आहे. येथे ३० हजार १६७ मतदारांचे ईएफ संकलनाबाहेर (Uncollectable) राहिले असून, डिजिटल नोंदींमध्ये २४ हजार ८३४ त्रुटी-विसंगती आढळल्या आहेत.
विक्रमगड विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख १५ हजार ७२९ मतदारांपैकी २ लाख ८९ हजार ०९१ मतदारांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. हे प्रमाण ९१.५६ टक्के आहे. या मतदारसंघात २६ हजार ६३८ मतदारांचे ईएफ संकलनाबाहेर असून, १० हजार ५१७ नोंदींमध्ये त्रुटी-विसंगती आढळल्या आहेत.
पालघर विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ९८ हजार ४३३ मतदारांपैकी २ लाख ४९ हजार ५१८ मतदारांचे ईएफ डिजिटलायझेशन पूर्ण झाले असून, त्याचे प्रमाण ८३.६१ टक्के आहे. येथे ४८ हजार ९१५ मतदारांचे ईएफ संकलनाबाहेर राहिले आहेत, तर डिजिटलायझेशन झालेल्या प्रक्रियेत २६ हजार ५७१ नोंदींमध्ये त्रुटी-विसंगती नोंदविण्यात आल्या आहेत.
बोईसर विधानसभा मतदारसंघात एकूण ४ लाख ३८ हजार २८७ मतदारांपैकी २ लाख ८७ हजार ७०९ मतदारांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. हे प्रमाण ६५.६४ टक्के आहे. येथे १ लाख ५० हजार ५७८ मतदारांचे ईएफ संकलनाबाहेर असून, ४४ हजार ३०२ नोंदींमध्ये त्रुटी-विसंगती आढळल्या आहेत.
नालासोपारा विधानसभा मतदारसंघात एकूण ६ लाख ६२ हजार ०५७ मतदारांपैकी ३ लाख ५५ हजार १०१ मतदारांचे ईएफ डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. हे प्रमाण ५३.६४ टक्के असून, सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये ते सर्वात कमी आहे. विशेष म्हणजे, येथे ३ लाख ०६ हजार ९५६ मतदारांचे ईएफ संकलनाबाहेर राहिले असून, ही जिल्ह्यातील सर्वाधिक संख्या आहे. त्याचप्रमाणे ईएफ डिजिटलायझेशन पूर्ण झालेल्यापैकी ५५ हजार ९२९ नोंदींमध्ये त्रुटी-विसंगती आढळून आल्या असून, जिल्ह्यातील ही देखील सर्वाधिक संख्या आहे.
वसई विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख ५४ हजार ९०८ मतदारांपैकी २ लाख ४९ हजार १६६ मतदारांचे ईएफ डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. हे प्रमाण ७०.२१ टक्के आहे. येथे १ लाख ०५ हजार ७४२ मतदारांचे ईएफ संकलनाबाहेर असून, २८ हजार ४०९ नोंदींमध्ये त्रुटी-विसंगती आढळल्या आहेत.
एकूणच पालघर जिल्ह्यात १७ लाख ०७ हजार ०५७ मतदारांचे ईएफ डिजिटलायझेशन पूर्ण झाले असताना, १ लाख ९० हजार ५६२ नोंदींमध्ये त्रुटी-विसंगती (अॅनॉमलीज) आढळणे ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे तर त्याचवेळी ६ लाख ६८ हजार ९९६ मतदारांचे ईएफ संकलनाबाहेर (Uncollectable)राहिले आहे.
*संकलनाबाहेर असलेल्या मतदारांमध्ये कोणाचा समावेश?*
संकलनाबाहेर (Uncollectable) राहिलेल्या ६ लाख ६८ हजार ९९६ मतदारांपैकी ७२ हजार ८६८ मतदार मृत असल्याचे नोंदविण्यात आले आहे. ४ लाख १६ हजार १९५ मतदार शोधूनही न सापडलेले किंवा अनुपस्थित (Untraceable/Absent) आहेत, तर ०१ लाख २३ हजार ४८२ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित (Permanently Shifted) असल्याचे आढळून आले आहे.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ईएफ संकलनाबाहेर राहिलेल्या मतदारांचे मतदार म्हणून असलेले अधिकार आपोआप संपुष्टात येणार नसून, जे मतदार प्रत्यक्षात संबंधित विधानसभा मतदारसंघात वास्तव्यास आहेत, त्यांनी आवश्यक ती कार्यवाही करून आपले नाव मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी किंवा समाविष्ट करण्यासाठी पुढील प्रक्रियेत अर्ज करणे आवश्यक आहे.
आता आयोगाने एसआयआर कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख ३१ ऑगस्ट ही निश्चित केली असून, त्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मतदारांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच दावे हरकतीबाबत नोटीस, सुनावणी व निकाली काढण्याची कार्यवाही ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर असून ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास किंवा नाव, पत्ता अथवा इतर तपशिलात त्रुटी असल्यास संबंधित मतदारांनी मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले आहे.