नवयुग पालघर Navyug Palghar २४ ऑगस्ट :
लैंगिक तस्करी-स्वरूप, कारणे व उपाय या विषयावर पालघर जिल्ह्यात काम करणारी आरोहन संस्था व अर्ज या संस्थेच्या वतीने
लैंगिक तस्करी विषयावर पालघरमध्ये चर्चासत्र संपन्न
अन्याय रहित जिंदगी (अर्ज) हि लैंगिक तस्करीविरोधात लढा देणारी गोव्यातील संस्था समविचारी संस्थांच्या सहकार्याने लैंगिक तस्करी या विषयावर राज्यभरात जिल्हापातळीवर संवाद साधत आहे. १८ ऑगस्ट २०२५ रोजी पालघर येथे लैंगिक तस्करी-स्वरूप, कारणे व उपाय या विषयावर पालघर जिल्ह्यात काम करणारी आरोहन संस्था व अर्ज यांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रात जिल्ह्यातील विविध संस्था संघटना, कार्यकर्ते व शासकीय विभागातील अधिकारी व प्रतिनिधी अशा ६५ पेक्षा अधिक लोकांनी सहभाग घेतला.
दशकपूर्ती झालेल्या पालघर जिल्ह्यातील विकासकामे, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि त्या बरोबर उद्भवणार्या विविध समस्यांमध्ये विशेष दखल घेण्याजोगी एक समस्या म्हणजे मानवी किंवा लैंगिक तस्करी. लैंगिक तस्करी म्हणजे एखाद्या व्यक्तीला - बहुतेक वेळा महिला किंवा मुलींना फसवून, धमकावून, लग्नाचे वचन, पैशाची लालूच देऊन किंवा जबरदस्तीने शरीरविक्रीसाठी भाग पाडणे. यात बर्याच वेळा गरीब, अशिक्षित किंवा असहाय्य महिलांना लक्ष्य केले जाते.
अर्जचे सल्लागार व व्यवसायाने मनोचिकित्सक असलेल्या डॉ. रुपेश पाटकर यांनी वेश्या व्यवसाय करणार्या स्रियांना शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात मिळणारी अपमानास्पद वागणूक, डॉक्टर म्हणून त्यांच्या समोर मन मोकळे करणार्या स्रियांच्या व्यथा, यातून बाहेर पडण्यासाठी धडपडणार्या खिया, खियाच नव्हे तर दलाल म्हणून काम करणार्या काही पुरुषांना होणारा मानसिक त्रास, अपमानास्पद जिणे यांचा पट उलगडून उपस्थितांच्या समोर ठेवला. ते म्हणाले, या व्यवसायात ढकलल्या जाणार्या स्रिया प्रतिरोध (rोग्ेूaहू), अनुकूलन (a्aज्ूaूग्दह), स्वीकृती (aम्मज्ूaहम) या तीन टप्प्यांतून जातात. यातील पहिल्या टप्प्यात या स्रिया किवा मुलींपर्यंत पोहोचणं जवळ जवळ अशक्य असतं. तिला बरेचदा सगळ्यांच्या नजरेआड बंद दारामागे ठेऊन तिच्या विरोधाला न जुमानता हा व्यवसाय करण्यासाठी तिच्यावर लैंगिक अत्याचार तसेच तिचा शारीरिक -मानसिक छळ केला जातो, याला घाबरून, थकून ती या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागते, व्यवसाय करायला तयार होते. या पहिल्या दोन टप्प्यांत तिला जर कुणाची मदत मिळाली तर ती निश्चितच यातून बाहेर पहाण्यासाठी तयार होते. परंतु जेव्हा तिला परतीचे सारे मार्ग बंद झाल्याचं जाणवतं तेव्हा मात्र ती बाहेर पडण्याऐवजी आहे तिथे पाय रोवून उभे राहण्यासाठी प्रयत्न करू लागते. केवळ रेड लाईट एरियातच नव्हे तर ऑनलाईन वेबसाईट, व्हाटस्अॅप च्या मदतीने हा व्यवसाय इतर भागातही सुरु असतो. केवळ तस्करीतूनच नव्हे, कमी वेळेत व श्रमात जास्त मोबदला देणार्या पार्ट टाईम फुल टाईम कामाच्या जाहिराती, प्रियकराकडून बदनामीची धमकी, ब्लॅकमेल यातूनही महिला/ मुली या व्यवसायात ढकलल्या जातात. बरेचदा या स्रियांना महिन्याकाठी मिळणारी मोठी रक्कम सोडावी लागू नये यासाठी त्या इतर कमी मोबदला मिळणार्या पर्यायांचा विचार करणार नाहीत असं आपल्याला वाटत असतं. पण अर्जच्या मदतीने काही मोजक्याच महिलांनी का होईना लाँड्री व्यवसायात पदार्पण केले. त्यांचा आदर्श ठेऊन नंतर इतरही महिला सन्मानपूर्वक जगण्यासाठी धडपडू लागल्या. अर्जचे संस्थापक, अरुण पांडे यांनी लैंगिक तस्करी म्हणजे नेमके काय, त्याची कारणे व परिणाम, लैंगिक तस्करीला प्रतिबंध करायचा तर काय करावे लागेल, लैंगिक तस्करीच्या बळी ठरलेल्या मुली-महिलांचे सुयोग्य पुनर्वसन कसे करता येईल, त्यासाठी समाजातील विविध घटकांची जबाबदारी, शासकीय घोरणे-कायदे, अशा विविध मुद्यांवर सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र हे गोव्यातील लैंगिक तस्करीसाठी एक प्रमुख स्रोत असणारे राज्य ठरत आहे. पालघरमधील ४ मुलीही गोव्यात सापडल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमध्येही लैंगिक तस्करीचे प्रमाण वाढीस लागल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. या व्यवसायातील लोकांनी तयार केलेले संपर्काचे जाळे अतिशय मजबूत असून आपले प्रयत्न त्यापुढे कधी कधी फिके वाटतात. या व्यवसायात मुली ढकलल्या जाऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना योग्य प्रकारे केल्या गेल्या, या विषयावर काम करणार्या संस्था- संघटना, कार्यकर्ते व शासन एकत्रित येऊन प्रयत्न केले, आपल्यातील संपर्काचे जाळे मजबूत केले तरच हे प्रमाण कमी होऊ शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यानंतर झालेल्या पॅनेल चर्चासत्रात मुंबई स्माईल, सवेरा, ओअॅसिस या संस्था तसेच बाल कल्याण समिती सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी पालघर जिल्ह्यात या विषयवार सुरु असलेले काम, पुनर्वसनाचे स्वरूप व प्रक्रिया यांची माहिती उपस्थितांना दिली. शाळांमधून मुलांशी या विषयावर संवाद साधण्यासाठी तसेच संबंधित प्रकरणे हाताळताना या विषयावर काम करणार्या संस्था-संघटना व कार्यकर्त्यांना आवश्यक सहकार्य मिळेल याची शाश्वती जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून मिलिंद धोंडे व बाल कल्याण समितीच्या राजकन्या अडोळे यांनी दिली.
महेश सावंत पटेल यांनी डॉ. पाटकर यांच्या पुस्तकावर आधारित लिहिलेल्या व सादर केलेल्या ’आयना का बायना’ या नाटकाविषयी उपस्थितांना माहिती दिली. जनजागृतीसाठी या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग केवळ प्रवास खर्चाच्या मोबदल्यात करण्याची इच्छा व्यक्त करून, ’एका मुलीचे आयुष्य जरी या नाटकामुळे वाचू शकले तर तीच आमच्यासाठी पोच पावती असेल’ असे ते म्हणाले.
शेवटी या विषयावर अधिक संघटित पद्धतीने स्थानिक पातळीवर प्रतिबंध, पुनर्वसन आणि संबंधित सेवांचे बळकटीकरण करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील संस्था संघटनांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे मत सहभागींनी व्यक्त केले. अरुण पांडे यांनी पालघर जिल्हा व लगतच्या भागातील प्रकरणांमध्ये सहकार्य करण्याची विनंती उपस्थितांना केली. आरोहन संस्थेने उपस्थितांचे आभार मानून चर्चासत्राची सांगता केली.