नवयुग पालघर Navyug Palghar Weekly
पालघर जिल्ह्यातील रासायनिक कारखान्यांच्या सुरक्षा व प्रदूषण नियंत्रणावर भर — जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पालघर दि. ५ सप्टेंबर : पालघर जिल्ह्यातील धोकादायक व अतिधोकादायक रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमधील प्रदूषण नियंत्रण, कामगारांची सुरक्षा आणि आपत्कालीन उपाययोजना याकडे विशेष लक्ष पुरविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी कारखान्यांमधील सर्व कामगारांना नियमित प्रशिक्षण देणे, कार्यशाळा आयोजित करणे आणि रंगीत तालीम (Mock Drill) राबविणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. “प्रत्येक कामगार संकटसमयी सक्षम प्रतिसाद देईल याची खात्री उद्योगांनी करून घ्यावी,” असे अधोरेखित करताना,कामगारांची सुरक्षितता ही उद्योगांची सामूहिक जबाबदारी असून त्यात कोणतीही तडजोड करता कामा नये, असे स्पष्ट निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना, प्रदूषण करणाऱ्या कंपन्याना नोटीस पाठविण्यासह, सामूहिक शुद्धीकरण प्रकल्पाचे काम नीट होत आहे कि नाही याचा अहवाल सादर करावा आदी सूचना करताना
कडक शब्दात योग्य समज दिली व काम नीट न झाल्यास अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येईल असे सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने, घन कचरा प्रकल्पासाठी योग्य जागेचा शोध घेऊन लवकर अहवाल सादर करावा असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
आमदार.राजेद्र गावीत यांनी उद्योगमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारखान्यांमध्ये होऊ शकणाऱ्या वायुगळती, आग, स्फोट व प्राणघातक अपघात टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना, सुरक्षा पद्धती व नियमित सुरक्षा लेखापरीक्षणाचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्हाधिकाऱ्यांनीही या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
कामगार उपआयुक्त, पालघर यांनी कामगारांच्या कौशल्य विकास संदर्भात महत्वाच्या सूचना करताना, प्रशिक्षित व सक्षम कामगारांमुळे अपघातांची शक्यता कमी होईल आणि उद्योगक्षेत्र अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने सक्षम होईल, असे सांगितले. बैठकीच्या शेवटी उपस्थित सर्व कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सुरक्षा आणि प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, जिल्ह्यातील तहसीलदार (दूरदृष्य प्रणालीद्वारे), विविध कारखान्यांचे मालक, व्यवस्थापक, प्रतिनिधी तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक, उपसंचालक, सहाय्यक संचालक, कामगार उपआयुक्त आणि संलग्न प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते