जिल्हास्तरीय शिक्षक वक्तृत्वस्पर्धा :१९ सप्टेंबरला आयोजन

Date: 2025-09-12
news-banner


नवयुग पालघर Navyug Palghar Weekly 

जिल्हास्तरीय शिक्षक वक्तृत्वस्पर्धा :बोईसर येथे१९ सप्टेंबरला आयोजन

बोईसर एज्युकेशन सोसायटी आयोजित आणि लायन्स क्लब ऑफ तारापूर पुरस्कृत जिल्हास्तरीय शिक्षक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक १:३० वाजता डॉ. स. दा. वर्तक विद्यालय, बोईसर येथे करण्यात आले आहे.

२००६ पासून सातत्याने होत असलेल्या या स्पर्धेचे यंदा विसावे वर्ष असून, यावेळी ही स्पर्धा एका आगळ्यावेगळ्या स्वरूपात रंगणार आहे.

चालू घडामोडींवर भाष्य :

स्पर्धेसाठी आयोजकांनी चार संकल्पना दिल्या आहेत –

भारताचे आंतरराष्ट्रीय धोरण

स्वदेशी : काळाची गरज

विद्यार्थी सुरक्षितता

सायबर क्राईम

स्पर्धकांनी यापैकी कोणतीही एक संकल्पना निवडायची असून, त्यावर आधारित विशिष्ट विषय परिक्षकांकडून देण्यात येईल. दिलेल्या विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत पाच मिनिटांत प्रभावी विचार मांडणे स्पर्धकांकडून अपेक्षित आहे.

शिक्षकांसाठी दर्जेदार व्यासपीठ

या स्पर्धेच्या माध्यमातून बोईसर एज्युकेशन सोसायटीने शिक्षकांसाठी विचारांच्या आदानप्रदानाचे एक दर्जेदार व प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. गेल्या दोन दशकांत या स्पर्धेत सहभाग व यश हे शिक्षकांसाठी प्रतिष्ठेचे प्रतीक ठरले आहे.

मान्यवरांची उपस्थिती

दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही पालघर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिक्षकांचे विचार ऐकण्यासाठी परिसरातील अनेक मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या उपक्रमाचे वैभव अधिकच वाढणार आहे.




Leave Your Comments