नवयुग पालघर ३१.०८/०७.०९
पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची सुरुवात
पालकमंत्री गणेश नाईक यांनी जागतिक तापमानाच्या संदर्भात उभ्या राहिलेल्या आव्हानांचा परामर्श घेत महाराष्ट्रात पाच वर्षांत २५० कोटी झाडे लावण्याचा संकल्प असल्याचे सांगून १० कोटी झाडे यावर्षी लावण्यात येतील अशी माहिती दिली. यासाठी आवश्यक रोपे तयार करण्यासाठी वनीकरण, सामाजिक वनीकरण,कृषी विभाग तसेच खाजगी रोपवाटिकांसह राज्यात पाच ठिकाणी टिशू कल्चरसाठी लॅब्स तयार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. बांबू लागवडीचा उपक्रमही राज्यात राबविण्यात येत असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
आपण निसर्गाचा र्हास चालवला असल्याचे सांगून पावसाचे मे मधील आगमन, सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत पाऊस टिकून राहणे यातून दिसून येणारा अवेळी
पाऊस, ढगफुटी आदींचा संदर्भ देत निसर्ग आपल्यावर कोपल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. प्लास्टिक आणि दुर्गंधी मुक्त पालघर जिल्हा यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे त्यांनी सांगितले तसेच येत्या पाच वर्षात पालघर जिल्हा महाराष्ट्रातील एक नंबरचा जिल्हा बनविण्याचे ध्येय समोर ठेऊन पालकमंत्री म्हणून काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामीण विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांना अनन्य साधारण महत्व असून या संस्थांचे बळकटीकरण आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश समोर ठेवून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. आजवरच्या विविध अभियानांचे/ योजनाचे एकत्रीकरण या अभियानात करण्यात आले असून शेवटच्या घटकांपर्यंत या योजना पोहोचवण्याचं काम या अंतर्गत करायचे आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळेत आपल्या प्रास्ताविकदरम्यान ते बोलत होते. ग्रामपंचायतींना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणावर बक्षिसांची तरतूद करण्यात आल्याचे सांगताना, या अभियान अंतर्गत विविध आठ घटकांवर काम करायचे असून त्याची माहिती रानडे यांनी यावेळी दिली. आमदार राजेंद्र गावित यांनी यावेळी बोलताना, सरपंचांवर या अभियानांतर्गत मोठी जबाबदारी असल्याचे सांगून स्वच्छ, सुंदर गावाकरता सर्वांना झटण्याचे आवाहन केले.
खासदार हेमंत सवरा यांनी १९९२-९३ मधील सुधारणांमुळे ग्रामपंचायतींना महत्त्वाचे अधिकार प्राप्त झाल्याचे सांगितले. हे अभियान राबवताना आपल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे विस्तृत सादरीकरण केले.