नवयुग पालघर
**तिरंग्याच्या साक्षीने पंचक्रोशी एकवटली; विमानतळ, टेक्स्टाइल पार्क, एसार (MIDC) आणि वाढवण बंदराला विरोध**
पालघर : हातात तिरंगा आणि दुचाकींवर स्वार झालेल्या हजारो ग्रामस्थांनी शनिवारी पंचक्रोशीतील रस्ते दणाणून सोडत प्रस्तावित दातिवरे-कोरे विमानतळ, एस्सार (MIDC) टेक्स्टाइल पार्क आणि वाढवण बंदराविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शेकडो दुचाकींच्या सहभागातून निघालेल्या या तिरंगा बाईक रॅलीत ‘एकच जिद्द, दातिवरे-कोरे विमानतळ, एस्सार (MIDC), टेक्स्टाइल पार्क आणि वाढवण बंदर रद्द’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचा उद्देश केवळ विरोध नोंदविणे नसून पंचक्रोशीतील नागरिकांना आगामी प्रकल्पांबाबत जागरूक करणे आणि सर्व गावांना एका व्यासपीठावर आणणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले.
*दातिवरेपासून पंचक्रोशीतील गावांपर्यंत एकजूट*
प्रस्तावित दातिवरे-कोरे विमानतळ, एस्सार (MIDC) आणि टेक्स्टाइल पार्कमुळे भविष्यात आपल्या गावांवर परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. या पार्श्वभूमीवर दातिवरे, कोरे, एडवण, मथाणे, भादवे, उसरणी, चटाळे, मधुकर नगर, दांडा-खटाळी, केळवे, आगरवाडी, सफाळे आणि पंचक्रोशीतील इतर गावांमधील नागरिक रॅलीत सहभागी झाले.
गावागावातून दुचाकीस्वार तिरंगे घेऊन रॅलीत दाखल झाले. तरुण-तरुणींच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत महिला, पुरुष आणि युवकांचाही सहभाग होता. त्यामुळे रॅलीला व्यापक ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.
*घोषणांनी परिसर दणाणला*
रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी प्रकल्पांविरोधात घोषणाबाजी केली. ‘विमानतळ रद्द करा’, ‘टेक्स्टाइल पार्क रद्द करा’, ‘वाढवण बंदर रद्द करा’ तसेच ‘एकच जिद्द’च्या घोषणांनी परिसरात वातावरण निर्माण झाले. दुचाकींवर फडकणारे तिरंगे आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेले नागरिक यामुळे रॅलीने लक्ष वेधून घेतले.
*गावागावात जनजागृती करणार*
प्रस्तावित दातिवरे-कोरे विमानतळ, "एस्सार (MIDC) आणि टेक्स्टाइल पार्क याबाबत पंचक्रोशीतील प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रकल्पांबाबत नागरिकांना माहिती देऊन त्यांना विश्वासात घेतले जाणार असून, गावागावातील नागरिकांची भूमिका जाणून घेतली जाणार आहे.
वाढवण बंदर हे या सर्व प्रकल्पांचे मूळ असल्याची भूमिका मांडत, बंदरासह संबंधित प्रकल्पांविरोधातील लढा व्यापक करण्याचा निर्धारही करण्यात आला. केवळ रॅलीपुरता विरोध मर्यादित न ठेवता पंचक्रोशीतील सर्व गावांना एकत्र करून मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
*आंदोलनाची पुढील दिशा ठरणार*
तिरंगा बाईक रॅलीची सांगता करताना पंचक्रोशीतील गावागावांत जनजागृती करून अधिकाधिक नागरिकांना या लढ्यात सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सर्व गावांच्या सहभागातून मोठे आंदोलन उभारून प्रस्तावित दातिवरे-कोरे विमानतळ, एस्सार (MIDC), टेक्स्टाइल पार्क आणि वाढवण बंदराविरोधातील भूमिका अधिक तीव्र करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.