पालघर जिल्ह्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” आणि “स्वच्छता ही सेवा 2025”ला उत्साहपूर्ण सुरुवात

Date: 2025-09-19
news-banner
नवयुग पालघर Navyug Palghar Weekly

https://youtu.be/l1ZnL7trn0s?si=eqcHWDEN7DxAyi7G
गावोगाव विकास व स्वच्छतेस नवे बळ :
पालघर जिल्ह्यात “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” आणि “स्वच्छता ही सेवा 2025”ला उत्साहपूर्ण सुरुवात

राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना सक्षम, लोकाभिमुख आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला 17 सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. या निमित्ताने चहाडे ग्रामपंचायतीत आयोजित ग्रामसभेतच “स्वच्छता ही सेवा 2025” या अभियानाचाही जिल्हास्तरीय शुभारंभ आमदार विलास तरे यांच्या हस्ते झाला.

या दुहेरी उपक्रमाच्या उद्घाटनावेळी आमदार विलास तरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप) राजन पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी बापूराव नाळे, सरपंच विष्णू जाधव, ग्रामपंचायत अधिकारी लता चौधरी तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभियानांचे उद्दिष्ट गावोगाव लोकसहभागातून मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे आणि सर्वांगीण विकास साधणे हे आहे. लोकाभिमुख प्रशासन, पाणीपुरवठा व्यवस्थापन, स्वच्छता, सौरऊर्जा, मनरेगा अभिसरण, संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास यांसोबतच सीसीटीव्ही बसविणे, वेबसाईट तयार करणे, ॲनिमिया मुक्त गाव, कर वसुली व श्रमदान संस्कृती या उपक्रमांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

यावेळी आमदार विलास तरे म्हणाले, “समृद्ध पंचायतराज अभियान गावोगाव विकासाचे नवे दालन खुले करणारे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने केवळ बक्षीस मिळवण्यासाठी नव्हे, तर गावाच्या भविष्यासाठी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. स्वच्छतेमुळेच गावाची खरी ओळख घडते.”

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आवाहन केले की, “चहाडे ग्रामपंचायतीने दाखवलेली उत्साही सुरुवात अनुकरणीय आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छता ही सेवा अभियान प्रभावीपणे राबवावे. सार्वजनिक उत्सव मंडळे, शाळा-विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांच्या सहभागातून हे अभियान यशस्वी करावे.”

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छ भारत दिवस’ साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत “स्वच्छता ही सेवा 2025” अंतर्गत “स्वच्छोत्सव” ही थीम निश्चित करण्यात आली असून ग्रामपंचायतींनी दैनंदिन उपक्रम राबवून गावांचा आरोग्यदायी आणि विकासाभिमुख चेहरा घडवावा, असेही मार्गदर्शन करण्यात आले.






Leave Your Comments