पालघर : बेपत्ता महावितरण कर्मचाऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला

Date: 2026-07-30
news-banner
नवयुग पालघर
****पालघर : बेपत्ता महावितरण कर्मचाऱ्याचा मृतदेह विहिरीत आढळला****

पालघर, दि. २९ (प्रतिनिधी) : पालघर पूर्व शाखेतील महावितरणचे कर्मचारी अख्तर हुसेन खान (उर्फ बाबू) यांचा मृतदेह नंडोरे-नवापाडा येथील शेतातील विहिरीत बुधवारी सायंकाळी आढळून आला. विजेचा बिघाड दुरुस्त करण्यासाठी गेलेले खान सोमवारी रात्रीपासून बेपत्ता होते. अंधारात विहिरीचा अंदाज न आल्याने ते विहिरीत पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी सायंकाळी नंडोरे-नवापाडा परिसरात उच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. हा बिघाड दूर करण्यासाठी अख्तर खान आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले होते. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सहकारी परतले; मात्र खान घरी पोहोचले नसल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यानंतर महावितरणचे कर्मचारी आणि नातेवाईकांनी परिसरात शोधमोहीम राबवली; मात्र अंधारामुळे त्यांचा शोध लागू शकला नाही.

दुसऱ्या दिवशी, २८ जुलै रोजी पालघर पोलीस ठाण्यात अख्तर खान बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतरही शोध सुरू असताना बुधवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांना नंडोरे-नवापाडा येथील शेतातील विहिरीत मृतदेह दिसून आला. अंगावरील कपड्यांवरून मृताची ओळख अख्तर हुसेन खान अशी पटली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अंधारामुळे विहिरीचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

अख्तर खान हे पालघर शहरातील वीरेंद्रनगर येथे वास्तव्यास होते. 'बाबू' या नावाने ते परिसरात परिचित होते. गेल्या काही वर्षांपासून ते महावितरणमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यापैकी दोन मुली विवाहित आहेत. पत्नी तसेच आई-वडिलांचे यापूर्वीच निधन झाले असून त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave Your Comments